पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्षांचे केले भव्य स्वागत, दिल्या या अमुल्य वस्तू भेट

संयुक्त अरब अमिराती राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे सोमवारी भारतात आगमन झाले.त्यांचा हा दौरा अवघ्या दोन तासांचा होता. या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण दौऱ्याने जागतिक राजकारणात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्षांचे केले भव्य स्वागत, दिल्या या अमुल्य वस्तू भेट
PM Modi gave a grand welcome to the UAE President in Delhi
| Updated on: Jan 19, 2026 | 8:19 PM

संयुक्त अरब अमिराती राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे भारताच्या दोऱ्यावर आले आहेत. त्यांनी केवळ दोन तास भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धावती भेट घेतल्याने जागतिक राजकारणात चर्चा सुरु आहे. मैत्रीचे नाते वृंद्धीगत करण्यासाठी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: जातीने विमानतळावर जाऊन शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे जोशात स्वागत केले आहे.

मैत्रीचे नाते महत्वाचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत शेख मोहम्मद यांचे स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन स्वागत केले. उभय नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देत स्वागत केले.जे दोन्ही देशांमधील घट्ट मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे. विशेष म्हणजे, स्वागतानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून विमानतळावरून मुक्कामाच्या ठिकाणाकडे रवाना झाले.राष्ट्राध्यक्ष शेख अल नाहयान सोमवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास दिल्लीत पोहोचले आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची त्यांची महत्त्वाची चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद ४:४५ वाजता सुरू झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी त्यांना पारंपरिक भारतीय वस्तू भेट केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांना राजेशाही कोरीव लाकडी झुला भेट दिला.त्यावेळी दोघेही या झुल्यावर बसले. गुजरातमधील अनेक कुटुंबांतील घरात अशा प्रकारचा सुंदर कोरीव काम केलेला लाकडी झुला असतो असे मोदी यांनी त्यांना सांगितले. या झुल्यावर नाजूक फुलांची आणि पारंपरिक नक्षी कोरलेली असून, कुशल कारागिरीचे दर्शन यातून घडते. गुजराती संस्कृतीत झुला एकत्र येणे, संवाद आणि पिढ्यान्‌पिढ्यांतील नातेसंबंध यांचे प्रतीक मानला जातो. यूएईने २०२६ हे ‘कुटुंब वर्ष’ म्हणून जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवरही विशेष भेट अर्थपूर्ण आहे.

तसेच पंतप्रधानांनी युएईच्या राष्ट्राध्यक्षांना सुशोभित चांदीच्या पेटीत ठेवलेली पश्मीना शालही भेट दिली. ही पश्मीना शाल काश्मीरमधील असून अतिशय नाजूक लोकरीपासून हाताने तयार केली जाते, त्यामुळे ती अतिशय मऊ, हलकी आणि उबदार असते. ही शाल तेलंगणामध्ये तयार केलेल्या सजावटीच्या चांदीच्या पेटीत ठेवली होती. या दोन्ही वस्तू भारताच्या समृद्ध हातमाग आणि हस्तकला परंपरेचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले.

चांदीच्या कोरीव पेटीत ठेवलेली पश्मीना शाल राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी हिज हायनेस शेखा फातिमा बिंत मुबारक अल केतबी यांनाही भेट देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना सुशोभित चांदीच्या पेटीत ठेवलेले काश्मिरी केशरही भेट देण्यात आले. काश्मीर खोऱ्यात पिकवले जाणारे हे केशर त्याच्या गडद लाल केशरी रंग आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे.