
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रामनवमी निमित्ताने मोदी दुपारी 12 वाजता भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्टी सागरी पुलाचं उद्घाटन करणार आहेत. इथून एक ट्रेन आणि बोट रवाना करतील. तसेच पुलाचं संचालनही करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. रामेश्वरममध्ये दुपारी सुमारे 1.30 वाजता ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. तसेच हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
पंतप्रधान मोदी नव्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील. तसेच रामेश्वरम – तांबरम (चेन्नई) नवीन ट्रेन सेवेला हिरवा झेंडाही दाखवतली. रामायणातील अख्यानानुसार रामेश्वरमच्या जवळच रामसेतूचे काम धनुषकोडीपासून सुरू झालं होतं.
रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल भारतीय अभियांत्रिकीचं जागतिक स्तरावरील एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधलेला हा पूल 2.08 किमी लांब आहे. यामध्ये 99 स्पॅन असून, 72.5 मीटरचा व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन आहे, जो 17 मीटर उंचीपर्यंत उचलला जाऊ शकतो.
हा पूल स्टेनलेस स्टील सुदृढीकरण, उच्च दर्जाच्या सुरक्षात्मक रंगसंगतीसह आणि संपूर्णपणे वेल्ड केलेल्या सांध्यांसह तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला अधिक टिकाऊपणा लाभतो आणि देखभाल कमी लागते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा पूल दुहेरी रेल्वे मार्गासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विशेष पॉलीसिलोक्सेन कोटिंगमुळे हा पूल गंजपासून सुरक्षित राहतो आणि समुद्रकिनारीच्या कठीण वातावरणात दीर्घकाळ टिकतो.
पंतप्रधान त्यांच्या तामिळनाडू दौर्यात 8300 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये एनएच-332 वरील 29 किलोमीटर लांब विलुप्पुरम-पुडुचेरी विभागाचं चौपदरीकरण, एनएच-40 वरील 28 किलोमीटर वालाजापेट-राणीपेट विभागाचं चौपदरीकरण, एनएच-32 वरील 57 किलोमीटर पूंडियनकुप्पम-सत्तनाथपुरम विभाग आणि एनएच-36 वरील 48 किलोमीटर चोलापुरम-तंजावूर विभाग राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत.
हे महामार्ग अनेक तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना जोडतील, शहरांमधील अंतर कमी करतील, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये, बंदरांपर्यंत जलद पोहोच शक्य करतील. याशिवाय, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादने जवळच्या बाजारात पोहोचवण्यास मदत करतील आणि स्थानिक चामडे व लघुउद्योग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींना चालना देतील.