Operation Sindoor : हिंदू नव्हे भारतीय! प्रियांका गांधींच्या भाषणावेळी संसदेत घमासान; काय घडलं?
ऑपरेशन सिंदूरवरून प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

Operation Sindoor : एप्रिल महिन्यात पहलगामवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत सोमवारपासून प्रदीर्घ चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे. पाकिस्तानची बाजू कमकुवत असताना भारताने कोणतीही अट न घालता शस्त्रसंधी का केली? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. आजदेखील दहशतवादाला रोखण्यासाठी सरकाच्या नीतीवर विरोधकांनी बोट ठेवले. आज खासदार प्रियांका गांधी यांनी तर आपल्या भाषणात सरकारवर टीकेचे आसूड ओढले. त्यांच्याच भाषणादरम्यान हिंदू-भारतीय अशी जोरदार घोषणाबाजी झाली.
संसदेत नेमकं काय घडलं?
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला यावर प्रियांका गांधी यांनी सरकारला घेरलं. त्यांनी सरकारच्या धोरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. पहलगाम आणि त्याच्या आजूबाजूला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. हे माहिती असूनही तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. बैसरन येथे पिरायला गेलेले पर्यटक हे सूरक्षेच्या दृष्टीने संपूर्णपणे सरकारवर अवलंबून होते. सरकारने मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले, असा हल्लाबोल प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केला.
याची जबाबदारी कोणी घेतली आहे का?
टीआरएफ ही दहशतवादी संघटना 2019 साली स्थापन झाली. या संघटनेने तिथे आतापर्यंत 25 दहशतवादी हल्ले केलेले आहेत. यात त्यांनी सैन्याचे अधिकारी, नागरिक, पोलिसांनाही मारलं आहे. या संघटनेला 2023 साली दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं. मधल्या काळात एवढे सारे प्राण गेले. याची जबाबदारी कोणी घेतली आहे का? असा रोखठोक सवाल प्रियांका गांधी यांनी केला.
सरकारला फक्त श्रेय घ्यायचं आहे
तसेच पाकिस्तानला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीदेखील युद्ध का थांबवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ड्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा का केली? असे गंभीर प्रश्नही प्रियां का गंधी यांनी उपस्थित केले. या सरकारला फक्त श्रेय घ्यायचं आहे. पण श्रेय घेण्यासोबतच जबाबदारीही घ्यावी लागते, असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला.
हिंदू-भारतीय घोषणाबाजी
त्यानंतर भापल्या भाषणादरम्यान प्रियांका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या सर्व 26 पर्यटकांची नावे घेतली. ही नावे घेत असताना त्यांनी या सर्वांचा भारतीय म्हणून उल्लेख केला. सत्ताधारी बाकावर बसलेल्या एका खसदाराने मात्र ते हिंदू होते असं म्हटलं. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी ते भारतीय होते असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर विरोधी बाकावरील खासदार चांगलेच आक्रमक झाले. प्रियांका गांधी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे नाव वाचवून दाखवत होत्या. तर दुसरीकडे विरोधी बाकावरील खासदार हे सर्वजण भारतीय होते असे सांगत होते. त्यामुळे संसदेत काही काळासाठी सत्ताधारी आणि विरोधकांत हिंदू आणि भारतीय असा संघर्ष पाहायला मिळाला.
