शेवटच्या श्वासापर्यंत सोबत.. एकत्र जगले, एकसाथच घेतला अखेरचा श्वास, पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू, कुठे घडली हृदयद्रावक घटना ?
बिहारच्या मुंगेरमध्ये एका वृद्ध जोडप्याच्या आजन्म प्रेमाची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. पत्नीच्या निधनानंतर, तिचा धक्का सहन न झाल्याने 87 वर्षीय पती विश्वनाथ सिंग यांचाही दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. 'सात जन्म साथ निभावण्याच्या' वचनाची पूर्तता करत दोघांची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली आणि एकाच चितेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्न करताना पती-पत्नी सप्तपदी घेतात आणि नेहमी एकमेकांसोबत राहण्याचे वचन घेतात, सात जन्म साथ निभावण्याची शपथही ते घेतात. संसारात प्रेमासोबत विश्वास आणि आधार पाहिजे. आजन्म एकमेकांसोबत राहणाऱ्या पती-पत्नीने एकमेकांसाबोतच अखेरचा श्वास घेतल्याची एक हृदयद्रावक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या मुंगेरच्या लल्लू पोखर मोहल्ल्यात मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. तिथे राहणारे लॉ कॉलेजचे प्रोफेसर विश्वनाथ सिंग यांच्या पत्नीचे (वय 82) सोमवारी निध झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब एकत्र आलं, ते शोकाकुल होते. मंगळवारी अंत्यसंस्काराची तयारी करून अंत्ययात्रा निघणार होती, तेवढ्यातच 87 वर्षांचे विश्वनाथ सिंह याचाही मृत्यू झाला. एकाच घरात दोन मृत्यू झाल्यायने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
आधी आईचा , मग दुसऱ्याच दिवशी वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब शोकाकुल झालं. विश्वनाथ सिंह यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरातील लोक आणि न्यायालयातील अनेक ज्येष्ठ वकिलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबाचे सांत्वन केले.
पती-पत्नीचा एकामागोमाग मृत्यू
विश्वनाथ सिंह हे मुंगेर येथील लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि मुंगेर कोर्टाचे एक विद्वान वकील देखील होते. 1961 साली त्यांचा विवाह भागलपूर जिल्ह्यातील शाहपूर येथील रहिवासी अहिल्या देवी यांच्याशी झाला. आजही अनेक मोठे वकील विश्वनाथ सिंह यांच्याकडून शिक्षण घेऊन मुंगेर न्यायालयात काम करतात. विश्वनाथ सिंह यांना तीन मुली व तीन मुलं आहेत. त्यांची लग्न झाली असून मोठा मुलगा शिक्षक आहे, दुसरा मुलगा वकील आहे तर तिसरा मुलगा बँकेतून रिटायर झाला.
मात्र आधी आई व नंतर वडील विश्वनाथ सिंह यांचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब हादरलं. विभेष कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या आईचे काल निधन झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेपूर्वी वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या आई आणि वडिलांची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली व आणि त्याच चितेवर अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसल्यानेच विश्वनाथ सिंह यांचा जीव गेला अशी माहिती समोर आली.
