Pahalgam Terror Attack: अतिरेक्यांना अन् हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार…नरेंद्र मोदी यांचा कठोर संदेश
Pahalgam Terror Attack Narendra Modi: ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार आहे. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Pahalgam Terror Attack Narendra Modi: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये दशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते. ते आपला दौरा रद्द करुन तातडीने भारतात आले. त्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेते पाकिस्तानवर कठोर कारवाई सुरु केली. सिंधू पाणी करार रद्द करत इतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा गुरुवारी झाली. राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त बिहारमध्ये मुधबनी येथे ही सभा घेतली. त्यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कठोर शब्दांत पाकिस्तानचे नाव न घेता संदेश दिला.
राष्ट्रीय पंचायती राज कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी अनेक घोषणा केल्या. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम त्यांच्या यूट्यूबवरील नरेंद्र मोदी या चॅनलवरही लाईव्ह होता. या वेळी अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीर परत घेण्याची मागणी केली.
पंतप्रधान मोदी यांचे भाषण लाईव्ह पाहणाऱ्या अनेक युजरने लिहिले, पीओके परत घ्या. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, आम्हाला संपूर्ण पाकिस्तान हवा आहे. एका युजरने लिहिले की, पीओके परत घेणे हा पाकिस्तानसाठी योग्य उपाय आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आम्हाला फक्त पीओके हवे आहे, दुसरे काही नाही. एका वापरकर्त्याने लिहिले की, पीओके हा एकमेव कायमचा उपाय आहे.
मोदी भाषणात काय म्हणाले?
पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खी झाला आहे, असे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले, या हल्ल्यात काहींना आपला मुलगा गमावला. काहींनी आपला भाऊ गमावला. कोणी आपला जीवनसाथी गमावला. त्यातील अनेक जण देशातील वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या सर्वांच्या मृत्यूवर आमचा आक्रोश, दु:ख एक सारखे आहे. हा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार आहे. आता दहशतवाद्यांना मातीत घालण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकीच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही. अतिरिक्यांचे नामोनिशान मिटवणार असल्याचा कठोर संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला.
नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतर संसदेची नवीन इमारत देशाला मिळाली. तसेच ३० हजार पंचायत भवन निर्माण केले. पंचायतीला फंड देण्यावर प्राधान्य दिले आहे. गेल्या दशकात दोन लाख कोटीचा फंड पंचायतीला दिला आहे. हा संपूर्ण पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्यात आला आहे. गावातील एक मोठी समस्या जमीनच्या वादाची राहिली आहे. पंचायतीची जमीन कोणती, सरकारी जमीन कोणती आहे. शेतीची जमीन कोणती आहे यावरून वाद होत होता. त्यामुळे जमिनीचे डिजीटलीकरण केले जात आहे. त्यामुळे अनावश्यक वाद सोडवण्यात मदत मिळाली आहे. पंचायतीने सामाजिक भागिदारीला कसे सशक्त केले आहे, हे आपण पाहिले. पंचायतीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणारे बिहार पहिले राज्य होते, असे मोदी यांनी सांगितले.
