पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता चित्रपट माहीत आहे का? वयाच्या 15 व्या वर्षी पाहिला, तो किस्सा…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता चित्रपट म्हणजे देव आनंदचा 'गाईड'. वयाच्या 15 व्या वर्षी पाहिलेल्या या सिनेमाने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. सिनेमाचा मूळ संदेश 'अंतर्मनातून मार्गदर्शन' आणि ग्रामीण भागातील दुष्काळाचं दाहक वास्तव मोदींच्या स्मरणात राहिलं. हा सिनेमा मोदींच्या विचारांना आणि सामाजिक दृष्टिकोनाला प्रेरणा देणारा ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मोदींच्या आवडीनिवडींवर चर्चा होत आहेत. मोदींना सिनेमा पाहायला आवडतो का? याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. पण आपल्याला फारसे सिनेमे पाहायला आवडत नाही, असं मोदींनीच यापूर्वी स्पष्ट केलं आहे. सिनेमाचा मी फार चाहता नाही. पण एका सिनेमाने माझ्या मनावर खूप प्रभाव पाडला होता, असं मोदींनी स्पष्ट केलंय. अनेकदा त्यांनी या सिनेमाचा उल्लेखही केला होता. तसेच या सिनेमाशी संबंधित किस्सेही सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा गाइड सिनेमा सर्वाधिक आवडतो. या सिनेमात देव आनंद यांच्यासोबत वहिदा रेहमान यांनी काम केलं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षी मोदींनी हा सिनेमा पाहिला होता. त्या वयात गाइड सिनेमा पाहिल्यानंतर मनावर मोठा प्रभाव पडला होता, असं मोदींनी सांगितलं होतं.
व्यक्तीगत स्वातंत्र्य ते आध्यात्म…
गाइड सिनेमा 1965मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विजय आनंद यांनी केलं होतं. देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या अभिनयामुळे हा सिनेमा संस्मरणीय ठरला होता. आरके नारायण यांच्या 1958मधील द गाइड या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत होता. या सिनेमाची कहाणी राजू नावाच्या एका टुरिस्ट गाइडच्या आवतीभोवती फिरते. विवाहित रोजीचं संसारात मन रमत नाही. पुढे ती राजूच्या आयुष्यात येते. या सिनेमात व्यक्तीगत स्वातंत्र्य, नातं, महत्त्वकांक्षा, सामाजिक दृष्टीकोण आणि आध्यात्मिकतेचे पैलू दाखवण्यात आले आहेत.
सिनेमाचा मूळ विचार…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमावर भाष्य केलं होतं. या सिनेमाच्या कहाणीवर नव्हे, तर सिनेमाचा जो मूळ विचार होता, त्यावर मोदींनी अधिक जोर दिला होता. प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतर्मनातूनच मार्गदर्शन मिळतं, हा गाइडचा मूळ संदेश होता, असं मोदी म्हणाले होते. जेव्हा माझं फारसं वय नव्हतं तेव्हा मी हा सिनेमा पाहिला. त्यावेळी मी या सिनेमातील विचारावरून माझ्या मित्रांशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी फार गांभीर्याने घेतलं नव्हतं, असं मोदी म्हणाले होते.
दाहक वास्तव काळजाला भिडलं
मोदींवर गाइडचा प्रभाव केवळ सिनेमातील दार्शनिक विचारांपुरता मर्यादित नव्हता. सिनेमात गावात दाखवलेला दुष्काळ आणि पाण्याची टंचाई आदी दृश्यांचाही मोदींवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील हे दाहक वास्तव त्यांच्या काळजाला भिडलं होतं.
2018मध्ये लडाखहून विद्यार्थ्यांचा एक गट मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आला होता. त्या चर्चेवेळी एका विद्यार्थ्याने मोदींना त्यांच्या सिनेमाच्या आवडीविषयी विचारलं होतं. त्यावर मोदींनी माझ्याकडे सिनेमा पाहण्यासाठी वेळ नाहीये. लहानपणी आणि तरुणपणात मी काही सिनेमे पाहिले होते. पण गाइडने माझ्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं, असं मोदींनी या विद्यार्थ्यांना सांगितलं.
