
टॅरिफ युद्ध आता चांगलंच भडकलं आहे. अमेरिकेमधून टॅरिफ वॉरची सुरुवात झाली होती. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारत आणि चीनवर टॅरिफ लावला होता, गेल्या ऑगस्ट महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफ धोरणाची घोषणा करतानाच भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. सध्या अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतो, त्याचा फायदा हा रशियाला युद्ध फंडसाठी होत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे मॅक्सिकोने देखील भारतासह आशिया खंडातील प्रमुख देशांवर आता 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून मॅक्सिको टॅरिफ लावणार आहे, दरम्यान हे टॅरिफ वॉर सुरू असतानाच आता चीनने देखील मोठी घोषणा केली आहे, चीनने नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनकडून EU अर्थात युरोपीयन यूनियन अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनकडून युरोपियन यूनियनमध्ये येणाऱ्या देशांकडून निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या डेरी प्रोडक्टवर 42.7 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत बोलताना चीनच्या उच्चस्थरीय अधिकार्यांनी माहिती दिली आहे. युरोपियन यूनियन अंतर्गत येणार्या देशांच्या प्रोडक्टमुळे चीनच्या डेअरी उत्पादनाला मोठा फटका बसत आहे, यामुळे चीनचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे चीनने आता या उत्पादनावर 42.7 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या या नव्या निर्णयामुळे आता जगभरात टॅरिफचं युद्ध आणखी भडकणार असल्याचं बोललं जात आहे.
युरोपियन यूनियनमध्ये येणाऱ्या देशांना तेथील सरकारकडून डेअरी प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात सबसीडी दिली जाते, त्यामुळे त्यांची उत्पादनं चीनमध्ये स्वस्त विकली जातात, त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. चीनमधील लोकल कंपन्या यामुळे तोट्यात जात असून, अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं चीनने स्पष्ट केलं आहे. येत्या 23 एप्रिलपासून चीनचा हा नवा टॅरिफ लागू होणार आहे, याचा मोठा फटका हा निर्यातीवर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.