Bihar Next CM : बिहारचं ठरलं, कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!

निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Bihar Next CM : बिहारचं ठरलं, कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
bihar next cm nitish kumar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2025 | 5:20 PM

Bihar Election Result 2025 : बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार मुसंडी मारली एकूण 243 जागांपैकी एनडीएच्या खात्यात एकूण 202 जागा आल्या आहेत. तर महागठबंधनला फक्त 35 जागाच जिंकता आल्या. दरम्यान, आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निकालानंतर एनडीएतून मुख्यमंत्रिपदावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता याच एनडीएच्या घटकपक्षातील नेत्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून काही संकेत दिले आहेत. याच प्रतिक्रियांवरून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ नेमकं कोण घेणार? हे आता स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

नितीश कुमार यांच्याच नेतृत्त्वात जनदेश

निवडणुकीनंतर आता बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. एनडीएचा भाग असलेल्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच हा लोकशाहीचा विजय असून मी नितीश कुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असे सांगितले आहे. सोबतच एनडीएला नितीश कुमार यांच्याच नेतृत्त्वात हा जनादेश मिळाला आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील, असे विधान संतोष सुमन यांनी केले.

चिराग पासवान यांनी दिले संकेत

त्यानंतर एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पडतील, असे सांगितले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते श्याम रजक यांनीही संपूर्ण एनडीए नितीश कुमार यांच्यासोबत आहे. एनडीएमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील, असे सूचित केले आहे.

नितीश कुमार हेच होणार मुख्यमंत्री?

दरम्यान, एनडीएचा विजय झाल्यानंत पुढच्याच काही तासांनी भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय एनडीएचे सर्व पक्ष एकत्र बसूनच घेतील, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. परंतु नंतर त्यांनी ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात आल्याचेही सांगितले. त्यामुळे आता एनडीएतर्फे नितीश कुमार यांच्याच नावाला पसंदी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तेच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, हे जवळजवळ स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे.