Operatin Sindoor : भारत-पाकिस्तानमधील सीजफायरच्या प्रश्नावर जयशंकर यांनी अमेरिकेला दाखवून दिली जागा
Operatin Sindoor : भारत-पाकिस्तानमध्ये 7 मे ते 10 मे अशी तीन दिवस लढाई चालली. या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका जर्मन वर्तमानपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या 3 दिवसाच्या लढाईत चीनला नेमंक काय हवं होतं? यावर सूचक उत्तर दिलं. त्याशिवाय सीजफायरच श्रेय घेणाऱ्या अमेरिकेलाही जागा दाखवून दिली.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षात चीनची भूमिका काय होती? यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सूचक उत्तर दिलं आहे. एक जर्मन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत एस. जयशंकर यांना चीनच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयशंकर म्हणाले की, “पाकिस्तानकडे जी शस्त्रास्त्र आहेत, ती चिनी बनावटीची आहेत. ते दोन्ही देश परस्परांच्या खूप जवळ आहेत. तुम्ही यावरुन तुमचा निष्कर्ष काढू शकता”
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष अणवस्त्राच्या वापरापर्यंत जाऊन पोहोचला होता का? त्यावर ‘या प्रश्नाच आश्चर्य वाटतं’ असं जयशंकर म्हणाले. “दक्षिण आशियात काही झालं की, पाश्चिमात्य देशांकडून म्हणजे युरोप, अमेरिकेकडून लगेच त्याचा संबंध अणवस्त्र संकटाशी जोडला जातो” असा टोला त्यांनी उत्तर देताना लगावला. अणवस्त्र संघर्षापासून जग किती लांब आहे, या प्रश्नावर जयशंकर यांनी खूपच लांब आहे, असं उत्तर दिलं.
‘आमची कृती मोजूनमापून’
“खूप, खूप लांब आहे, खरं सांगायच झाल्यास तुमच्या प्रश्नाच मला आश्चर्य वाटतं. दहशतवादी तळ आमचं लक्ष्य होतं. मोजूनमापून, फार काळजीपूर्वक विचारकरुन तणाव वाढणार नाही अशा पद्धतीची आमची कृती होती. पण पाकिस्तानी लष्कराने आमच्यावर गोळीबार केला. आम्ही तुमची एअर डिफेन्स सिस्टिम निष्प्रभ करु शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. त्यानंतर त्यांच्या विनंतीवरुन गोळीबार थांबला” असं जयशंकर म्हणाले.
अमेरिकेला जागा दाखवून दिली
भारत-पाकिस्तानमध्ये जो सीजफायर झाला, त्यासाठी जगाने अमेरिकेचे आभार मानावे का? हा प्रश्न सुद्धा जयशंकर यांना विचारण्यात आला. “दोन्ही बाजूच्या लष्करी कमांडर्समध्ये थेट चर्चेनंतर शस्त्रसंधीचा निर्णय झाला. दिवस उजाडण्याआधीच आम्ही प्रभावी हल्ला करुन पाकिस्तानचे एअरबेस आणि एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केली. मग, शस्त्रसंधीसाठी मी कोणाचे आभार मानायचे? मी भारतीय सैन्यदलांचे आभार मानीन, कारण भारतीय सैन्यदलांमुळे पाकिस्तानला बोलावं लागलं, आम्ही थांबतोय” या उत्तरातून जयशकंर यांनी अमेरिकेला जागा दाखवून दिली.
