
कपटी आणि काडीबहाद्दर, कुरापतीखोर पाकिस्तानचा अजून एक भयंकर चेहरा समोर आला आहे. खोट्या प्रचारतंत्राचा वापर करून भारतात आणि पाकिस्तानात चुकीची माहिती पसरवण्याचा पाक सरकार आणि लष्कराचा डाव उघड झाला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून 7 मे रोजी मध्यरात्री 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर सातत्याने पाकडा खोटी माहिती देत आहे. मुस्लिम राष्ट्रांच्या मंचावर तर तो धाय मोकलून रडला. अमेरिकेसह रशियाने पाकिस्तानच्या या उलट्या बोंबावर कडक ताशेरे ओढल्यानंतर पाकिस्तान वरमला. त्याने आता सोशल मीडियाद्वारे भारताविरोधात डिजिटल वॉर सुरू केले आहे. त्याचा आज कर्नल सोफिया कुरेशी यांनी पडदा फाश केला.
पाकिस्तानचा आक्रस्तळेपणा
थोड्यावेळापूर्वी परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी भारताने केलेली कारवाई आणि पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या आगळिकीची माहिती दिली.
भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा आक्रमक पणा दिसून आला. पाक सैन्याने ड्रोन, मिसाईल यासह लोईटरिंग एम्युनिशन ड्रोनचा सातत्याने वापर केला. तर अनेक लांबपल्ल्याच्या मिसाईलचा वापर केला. पंजाब हे पाकिस्तानचे टार्गेट असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानने भारतीय नागरिकांना आणि रहिवाशी भागांना लक्ष्य केल्याचे ते म्हणाले. याशिवाय पाकड्यांनी चुकीची माहिती आणि खोट्या प्रचार तंत्राचा सातत्याने वापर सुरू केल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले. त्यांनी पाकड्यांच्या खोट्या प्रचार यंत्रणेची माहिती दिली.
मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना केले लक्ष्य
या संयु्क्त पत्रकार परिषदेत पाकिस्तान वारंवार धार्मिक स्थळांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले. जम्मू मधील प्रसिद्ध शंभू मंदिर आणि रहिवाशी क्षेत्रांना टार्गेट करण्यात आल्याचे कुरेशी आणि सिंह यांनी सांगितले. अर्थात भारतीय सशस्त्र दलांनी हे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानने शाळा आणि रुग्णालय परिसरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तर काही भागातील भारतीय विमानतळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
खोटे प्रचारतंत्र उघड
पाकिस्तान सैन्य आता खोट्या प्रचारतंत्राचा वापर करत असल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले. आधमपूर येथील एस-400 ही एअर डिफेन्स सिस्टिम, सुरजगड आणि वासूसाचे विमानतळ, मग्रुराटा येथील ब्रम्होस स्थळ, देहरागिरी येथील तोफखाना आणि चंदीगड येथील दारुगोळा साठ्यांवर हल्ला करून ते नष्ट केल्याचा दावा केला होता. हा दाव सपशेल खोटा असल्याचे कर्नल कुरेशी यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानमधील रहिवासी भागांना लक्ष्य केले नसल्याचे पुन्हा एकदा लष्कराने स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तान याविषयी करत असलेले सर्व दावे हे खोटे असल्याचे उघड झाले आहे.