PM नरेंद्र मोदींचं नक्षलग्रस्त ठिकाणावरून मोठं विधान; 50 वर्षांनंतर अशी दिवाळी आलीय, कारणही सांगितलं
Pm Narendra modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधून देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचा देखील दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी नलक्षग्रस्त भागातील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची माहिती दिली. आता देशात नक्षलवाद संपून विकास सुरू झाला आहे. त्यामुळे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी बस्तरच्या जंगलात आलो आहे. सैनिकांसोबत संवाद साधताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, आज देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी केली जात आहे. लोक दूरचा प्रवास करून घरी पोहोचले आहेत. कुटुंब आणि नातेवाईकांची भेट घेण्याचा हा मोठा उत्सव आहे. मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. सीमेवर देशाचं रक्षण करणारे वीर जवान तरुण आणि तरुणी माझ्यासाठी प्रिय आहात. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. कारगिल ते लेपचापर्यंत, समुद्र किनारा ते समुद्रातील आयएनएस विक्रांतपर्यंतच्या जवानांसोबत साजरी केलेली दिवाळी विस्मरणीय राहिलेली आहे. देश नक्षलमुक्त करण्याचं श्रेय हे लाखो जवानांचं आहे. आज मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. 140 कोटी लोकांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे’.
‘यंदाची दिवाळी खास आहे. देश नक्षलमुक्त झाल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे. देशाने नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाविरोधात दशकांहून अधिक लढाई सुरू होती. ही लढाई जिंकली आहे. देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादापासून मुक्त झाला आहे. खरंतर लाखो देशवासीयांनी नक्षलवाद्याच्या भीतीवर विजय मिळवला आहे. माओवाद आणि नक्षलवादाविरोधातील लढा सोपा नव्हता. एकेकाळी देशातील 20 राज्यातील 230 हून अधिक जिल्हे हे नक्षलग्रस्त झाले होते. यामुळे संध्याकाळनंतर जनजीवन ठप्प व्हायचं. या नक्षलवाद्यांनी लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. बिहार, महाराष्ट्र, ओरिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह देशातील मोठा भाग हा नक्षलवाद्यांच्या विळख्यात अडकला होता. विविध भागात नक्षलवादी हल्ले व्हायचे. दंतेवाडामधील एक घटनेत 44 नागरिक ठार झाले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांसोबत अनेक दशके लढाई सुरू राहिली. याच काळात छत्तीसगडमध्ये एक हजारांहून अधिक सैनिक शहीद झाले. तर IED स्फोटात अनेक सैनिकांनी अवयव गमावले होते, असे त्यांनी पुढे सांगितले.
