“अण्णा हजारेंना या पिडेतून मुक्ती मिळाली”, पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
आज भाजप मुख्यालयात जोरदार जल्लोष केला जात आहे. या विजयोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे आभार मानले.

राजधानी नवी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले असून आपला पराभवाचा दणका बसला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. यामुळे दिल्लीत भाजपचे कमळ फुलले असून भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव झाल्यानंतर भाजपने मोठा जल्लोष केला. दिल्लीत भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचाही उल्लेख केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने भाजपचा 27 वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप मुख्यालयात जोरदार जल्लोष केला जात आहे. या विजयोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे आभार मानले.
“जिथे एनडीए आहे तिथे सुशासन”
“संपूर्ण देशाला माहीत आहे की, जिथे एनडीए आहे तिथे सुशासन आहे. विकास आहे,. विश्वास आहे. एनडीएचा प्रत्येक उमेदवार, लोकप्रतिनिधी लोकांच्या हिताचं काम करत आहे. देशात एनडीएत जिथेही जनादेश मिळाला, आम्ही त्या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे भाजपला सातत्याने विजय मिळत आहे. लोक आमच्या सरकारला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून देत आहे. उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, आसाम, मणिपूर प्रत्येक राज्यात आम्हाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. या दिल्लीच्या बाजूला यूपी आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था मोठं आव्हान होतं. सर्वात मोठं आव्हान महिलांसाठी होतं. मेंदूचा ताप वाढायचा. आम्ही त्याचा अंत करण्यासाठी संकल्प करून काम केलं”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“यमुनेला दिल्लीची ओळख करणार”
“महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर संकट यायचं. आम्ही जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी पोहोचवलं. हरियाणातही विकास केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं सरकार आलं आहे. यमुनेला दिल्लीची ओळख करणार. आम्ही संकल्प केला आहे. हे काम कठिण आहे. दीर्घ काळापासूनचं आहे. कितीही वेळ गेला, शक्ती कितीही लागली तरी संकल्प मजबूत असेल तर आपण यमुना स्वच्छ करू”, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“ही पण मोदींची गॅरंटी”
“मी अण्णा हजारे यांचं विधान ऐकत होतो. अण्णा हजारे हे बऱ्याच काळापासून आपदावाल्याची पिडी झेलत होते. त्यांनाही या पिडेतून मुक्ती मिळाली असले. ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला. तेच भ्रष्टाचारात बुडाले. या पक्षाचे मंत्री, मुख्यमंत्री भ्रष्टाचारात तुरुंगात गेले. स्वतला इमानदारीचं प्रमाणपत्र द्यायचे. आणि दुसऱ्यांना भ्रष्टाचारी ठरवायचे. तेच भ्रष्टाचारी निघाले. दारू घोटाळ्याने दिल्लीला बदनाम केलं. अहंकार एवढा, लोक कोरोनाने होरपळली होती, तेव्हा आपदावाले शीशमहल बनवत होते. त्यांनी आपला प्रत्येक घोटाळा लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले. आता दिल्लीचा जनादेश आला आहे. पहिल्या विधानसभा अधिवेशनात सीएजीचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराची चौकशी होईल. ज्याने लुटलं असेल त्याला भरावं लागेल. ही पण मोदींची गॅरंटी आहे”, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.