पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल, पोलिसांची मोठी कारवाई
शहीदांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न... पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची मोठी कारवाई, लॅपटॉप, मोबाईल अन्य डिव्हाइस आणि...

जम्मू – काश्मिर येथेल पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल 26 जणांनी आपले प्राण गमावले. या गल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी AI च्या मदतीने अश्लील व्हिडीओ तयार करुन व्हायरल करणाऱ्या दोन सायबर आरोपींना पालिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा गैरवापर करून एका शहीद नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्याचा आरोप आहे.
हरियाणा पोलिसांनी गोपालगंज पोलिसांच्या मदतीने मांझा पोलिस स्टेशन परिसरातून दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची ओळख मोहिबुल हक आणि गुलाम जिलानी अशी झाली आहे, ते मांझा पोलिस स्टेशन परिसरातील धोबावालिया गावातील रहिवासी आहेत. या प्रकरणात हरियाणातील गुरुग्राम येथील सायबर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक तपासात व्हिडिओचा स्रोत आणि स्थान शोधून दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. गोपालगंजचे पोलिस अधीक्षक अवधेश दीक्षित म्हणाले की, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, यूट्यूब चॅनेल ट्रॅक करण्यात आले आणि नंतर हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून त्यांचं लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य डिव्हाइस देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान, त्यांनी इतर अनेक लोकांना लक्ष्य करून असे व्हिडिओ बनवल्याचेही उघड झाले आहे. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. या सायबर आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाचाही पोलिस तपास करत आहेत.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं, तेथून हरियाणा पोलिसांनी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन गुरुग्रामला नेले. त्यांवर कायदेशीर कारवाई हरियाणा याठिकाणी होईल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या याप्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी व्हिडिओ बनवून शहीदांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाच नाही तर सामाजिक तणाव पसरवण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात आयटी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा पोलिस आता या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करत आहेत.
