राष्ट्रपतींसोबत अविश्वसनीय बैठक, त्यांनीही मतचोरी नाकारली नाही; राहुल गांधींचा मोठा दावा
राहुल गांधी यांच्यासह १० नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेलं होतं. त्यानंतर भेट कशी राहिली याबद्दल या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींसोबतची बैठक ही अविश्वसनीय अशी राहिल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली, ते नेमकं काय म्हणाले?

सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांना आमच्या मागण्याचं निवेदन दिलं. गेल्या चार दिवसांतील आमच्या आंदोलनाची माहितीही त्यांना दिली. सगळ्यांनी आमचं म्हणणं त्यांना सांगितलं. देशात मतचोरी कशी होत आहे. हे आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं. देशामध्ये आता इव्हिएम मशीन नको, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं असल्याचं यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्यावतीने बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, निवडणूक आयोगाने आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत, त्यामुळे मतचोरीसारखे प्रकार होणार नाहीत. त्यावर राष्ट्रपतींनी आम्हाला पुरावे मागितले, ते सर्व पुरावे आम्ही एकत्र करत आहोत. तर राष्ट्रपतींशी भेटून आम्ही समाधानी आहोत. मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार हे लोकशाही संपवण्याचं काम करत आहेत, असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनीही ऐकून घेतलं आहे, अशी माहिती खर्गेंनी दिली आहे.
खर्गेंनी सांगितलेल्या सर्व गोष्टींबद्दल राष्ट्रपती सकारात्मक विचार करताना दिसल्या. त्यांनीही आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे. आम्ही त्यांना सांगितलं की, तुमच्या हाती देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. देशात जे चाललंय त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही पुरावे देऊ, देशातील नागरिकांनाही मतचोरी होत असल्याचं मान्य आहे. देशातली लोकशाही टिकली पाहीजे, अशी भूमिका आम्ही मांडल्याचं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.
तर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगितलं की, राष्ट्रपतींशी भेटून मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण देशात मतचोरी होत असल्याचं त्यांनीही नाकारलं नाही. त्यांनी सांगितलं की पुरावे घेऊन या. आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं की, ज्ञानेश कुमार, अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लोकशाही संपवायला निघाले आहेत. त्यांनी पुरावे मागितल्यामुळे आम्ही पुरावे देणार आहोत. सगळ्या देशाला माहिती आहे, देशात मतचोरी होत आहे.
मोदी हे मतचोरीचे निर्माता आहेत. तर ज्ञानेश कुमार हे कार्यवाहक आहेत. राष्ट्रपती मतचोरी झाली नाही म्हणतील, असं मला वाटलं होतं, पण राष्ट्रपतींनी मतचोरी झाल्याला नकार दिला नाही, असा दावा यावेळी राहुल गांधींनी केला. पुढे बोलताना राहुल गांधींनी सांगिलतं की, त्यांनी आम्हाला वेळ दिला, आमचं ऐकून घेतलं त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासोबतची ही बैठक अविश्वसनीय होती. पुरावे मिळाल्यानंतर कारवाई करु, असे आम्हाला कारवाई करण्याचे आश्वासनही दिले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
