शॉर्टकट राजकारणाचे जनतेने ‘शॉटसर्किट’ केले…नरेंद्र मोदी यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला
PM Narendra Modi On Delhi Election: दिल्लीत देशभरातून आलेले लोक आहेत. त्यामुळे दिल्ली मिनी भारत आहे. दिल्लीत दक्षिण भारतातील लोक आहेत. तसेच पश्चिम भारतातील लोकही आहेत. पूर्व भारतातील लोक आहेत त्याप्रमाणे उत्तर भारतातील लोकही आहेत.

PM Narendra Modi On Delhi Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळाला. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सफाया झाला. त्यानंतर दिल्लीतील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. दिल्लीच्या जनतेने शॉर्टकटवाल्यांचे ‘शॉटसर्किट’ केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज दिल्लीच्या जनतेने स्पष्ट निर्देश दिले. जनतेने डबल इंजिन सरकारकडे आपला कल दिला. जी लोक दिल्ली आपल्या मालकीची असल्याचे सांगत होते, त्यांना जनतेने दाखवून दिले की दिल्लीचे खरे मालक फक्त आणि फक्त दिल्लीची जनता आहे. ज्यांना दिल्लीचे मालक होण्याचा अहंकार होता, त्यांचा अहंकार या निवडणुकीत मातीमोल झाला आहे. त्यांचा सत्याशी सामना झाला आहे. दिल्लीच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे राजकारणात शॉर्टकट अन् खोट्यानाट्यासाठी कोणतेच स्थान नाही, हे स्पष्ट केले आहे. जनतेने शॉर्टकटवाल्या राजकारणाचे शॉर्टसर्किट केले आहे. दिल्लीच्या जनतेने लोकसभेत भाजपला कधीच निराश केले नाही. २०१४, २०१९, २०२४ तिन्ही निवडणुकीत दिल्लीच्या लोकांनी भाजपला सातच्या सात जागांवर विजयी केल्याबद्दल मोदी यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले.




पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजच्या निकालाने दुसरी बाजू समोर आली आहे. दिल्लीत देशभरातून आलेले लोक आहेत. त्यामुळे दिल्ली मिनी भारत आहे. दिल्लीत दक्षिण भारतातील लोक आहेत. तसेच पश्चिम भारतातील लोकही आहेत. पूर्व भारतातील लोक आहेत त्याप्रमाणे उत्तर भारतातील लोकही आहेत. विविधतेने भरलेली दिल्ली भारताचे लघू रूप आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मोदी पुढे म्हणाले, दिल्लीत प्रत्येक भाषा बोलणारे लोक आहेत. प्रत्येक राज्यातील लोकांनी दिल्लीत भाजपवर विश्वास दाखवला. मी जिथेही गेलो, त्याठिकाणी अभिमानाने सांगायचो, मी तर पूर्वांचलमधून खासदार आहे. पूर्वांचलशी माझे आपुलकीचे नाते सांगत होतो. पूर्वांचलच्या लोकांनी या नेत्याने प्रेमाची, विश्वासाची नवीन ऊर्जा दिली, नवीन ताकद दिली. म्हणूनच मी पूर्वांचलच्या लोकांचा, पूर्वांचलचा खासदार म्हणून आभार मानतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.