
भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. 2024 विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत गडबडीचा आरोप करत आहेत. यापूर्वी हा मुद्दा सुप्रीम कोर्टात सुद्धा गाजला होता. निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप खोडून काढले होते. विरोधी पक्षांनी कसल्याप्रकारची लिखीत तक्रार समोर आणली नसल्याचे कालपरवापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग सांगत होता. आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब टाकला.
एकाच व्यक्तीचे तीन राज्यात मतदान
निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. त्यांनी त्यासाठी थेट पुरावा पण सादर केला. आदित्य श्रीवास्वत नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आयोगाने आम्हाला डेटा दिला नाही. पण आम्ही त्यांना पुरावे दिले असा टोला त्यांनी लगावला.
भाजप-निवडणूक आयोगाने मतं चोरली
भाजप आणि निवडणूक आयोगाने विविध राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभेत मतं चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. आम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यापासूनच दाल में कुछ काला है असं वाटत होतं. भाजपाला अँटी इनकम्बन्सी वाटत नव्हती. त्यामागील हे कारण आहे. मत चोरी भारताविरोधात आणि भारतीय राज्य घटनेविरोधात रचलेला मोठा गुन्हा आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घातला.
लोकसभेला विजय, विधानसभेत पराभव कसा?
देशात विरोधात वातावरण असताना त्याचा फटका केवळ भाजपलाच का बसत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. सत्ताविरोधी मतदानाचा लोकशाहीत सर्वांना फरक पडतो. पण भाजपला का फटका बसला नाही. बनावट लोकांचा मतदार यादीत समावेश हा प्रश्न आहे. मतदार यादीत मतदार वाढवले का? असा सवाल त्यांनी सुरुवातीला केला. प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका सर्व पक्षांना बसतो. पण तो भाजपलाच का बसत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात महिनाभर चाललेली मतदान प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे. लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय होतो. तर पाचच महिन्यानंतर विधानसभेला पराभव होतो, त्यामागील कारणं त्यांनी विषद केली.
5 वर्षांपेक्षा 5 महिन्यात सर्वाधिक मतदार वाढले
महाराष्ट्रात 5 वर्षांत जितके मतदार वाढले नाही ते अवघ्या 5 महिन्यात वाढवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेपर्यंत मतदार वाढले. मतदार इतके वाढले की महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा त्यांची संख्या अधिक होती. ही तर धक्कादायक आकडेवारी आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीचा पत्ता साफ होतो. पण त्याअगोदर लोकसभेत तिची लोक आम्हाला भरभरून मतं टाकतात. मग संशयाला भरपूर जागा उरतेच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 1 कोटी मतदार वाढले. मतदार यादी ही देशाची संपत्ती आहे. ती देण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली. ज्यांना दिली, ती पण अशी दिली की त्याचे तुम्ही विश्लेषण करू शकणार नाही. तर निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजच नष्ट केल्याची माहिती दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. ही मतांची चोरी असल्याचा दावा त्यांनी केला.