इंडिया आघाडीच्या मोर्चात मोठा ट्विस्ट, नव्या मागणीने केंद्र सरकारला फुटणार घाम; दिल्ली दणाणून सोडली

इंडिया आघाडीने दिल्लीत जोरदार मोर्चा काढला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली १४० खासदारांनी निवडणूक आयोगाकडे निघालेला मोर्चा अडवल्याने ठिय्या आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधकांची नवी मागणी आहे, ज्यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. '

इंडिया आघाडीच्या मोर्चात मोठा ट्विस्ट, नव्या मागणीने केंद्र सरकारला फुटणार घाम; दिल्ली दणाणून सोडली
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 12:07 PM

इंडिया आघाडीचा दिल्लीत जोरदार मोर्चा सुरू आहे. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने निघालेला हा मोर्चा मध्येच अडवण्यात आला आहे. मोर्चा मध्येच अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. ज्ञानेश कुमार चोर हैच्या घोषणा दिल्या जात असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्लीचं वातावरण ढवळून निघालं आहे.

इंडिया आघाडीच्या या मोर्चात आतापर्यंत 140 खासदार सामील झाले आहेत. आकाशवाणी भवनच्या गेट नंबर 3 समोर 100 मीटर अंतरावर हा मोर्चा अडवण्यात आल्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या इतर खासदारांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. हातात फलक घेऊन रणरणत्या उन्हात हे खासदार आंदोलन करत आहेत. मोर्चेकऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसू नये म्हणून आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.

Loading...

समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद यादव आणि इतर पक्षाचे खासदार बॅरिकेडवर चढले आहेत. पहिलं बॅरिकेड संसद भवनापासून 400 मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी बसेस तैनात ठेवण्यात आल्या आहेत. पॅरामिलिट्री फोर्सलाही पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, आतापर्यंत कुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये.

नवी मागणी काय?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात हा मोर्चा सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी हा घोटाळा उघड झाल्यापासून ही मागणी लावून धरली आहे. मात्र, आजच्या मोर्चात विरोधकांनी आणखी एक नवीन मागणी केली आहे. देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सपाचा आरोप काय?

यावेळी समाजवादी पार्टीचे खासदार राजीव राय यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप लावला आहे. पीडीएच्या मतदारांची नावे हटवली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करण्यात आलेले 15,000 व्होटर रेकॉर्ड सादर करण्यात आले होते. पण त्यावर मला अद्याप निवडणूक आयोग आणि सरकारकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही, असं राय यांनी सांगितलं.

जेनजी स्टाईल घोषणा

या मोर्चात जेनजी स्टाईल घोषणा देण्यात येत आहेत. व्होट चोर, व्होट चोर, ज्ञानेश कुमार व्होट चोर… ज्ञानेश इट्स डन ब्रो… अशा जेनजी स्टाईल घोषणाही यावेळी देण्यात येत आहेत.

मोठा बंदोबस्त

या ठिकाणी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस आता प्रत्येक आंदोलनात बॉडी कॅमेरा लावूनच ड्युटी करत आहेत. नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा हे सुद्धा बॉडी कॅमेरा लावूनच ड्युटीवर तैनात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us