दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात वातावरण तापलं, राहुल गांधींना आकाशवाणी कार्यालयाच्या गेटवर रोखलं, नेमकं काय घडलं?
दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. राहुल गांधींना आकाशवाणी कार्यालयाच्या गेटवर रोखण्यात आलं आहे.

दिल्लीत मोठा राडा झाला आहे. इंडिया आघाडीने रस्त्यावर उतरत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. इंडिया आघाडीचे खासदार आंदोलन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. इंडिया आघाडीचे विरोधक रस्त्यावर उतरून मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे निघाले आहेत. त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. सध्या सर्व विरोधक आकाशवाणी कार्यालायापर्यंत पोहोचले आहेत. आकाशवाणी कार्यालयाच्या पुढे मुख्य निवडणूक आयुक्तांचं कार्यालय आहेत. या मुख्यालयाजवळ राहुल गांधी आणि पोलिसांची चर्चा सुरू आहे.
इंडिया आघाडी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक
इंडिया आघाडीच्या 140 हून अधिक खासदारांनी एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात संसद भवन ते निवडणूक आयोगाचं मुख्यालयापर्यंत आंदोलनाची घोषणा केली होती. या मोर्चामध्ये समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ ब्रायनसहित इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले. या खासदारांना निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत जाण्यापासून रोखलं जात आहे. काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्लीतील आंदोलनात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादीचे खासदार, ममता बॅनर्जींच्या पक्षातील खासदार, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चातीवल खासदारांसहित अनेक नेते सहभागी झाले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी कार्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या भागात मोठ्या संख्येने दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. काही ठिकाणी बॅरिकेट्स देखील लावण्यात आलं आहेत.
राहुल गांधी, प्रियंका गांधींना आकाशवाणी भवनाच्या गेटवर रोखलं
राहुल गांधी यांना आकाशवाणी भवनात शिरताना रोखण्यात आलं. आकाशवाणी कार्यालयाच्या मार्गातून आयोगाच्या कार्यालयात जाण्याचा मार्ग आहे. परंतु त्यांना गेटजवळच रोखण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनच्या मागील गेटवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. या आंदोलनात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अखिलेश यादव यांनीही थेट ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखिलेश यादव यांनीही मतचोरीचा आरोप केला आहे.
