Rahul Gandhi : पप्पू नव्हे, स्मार्ट आहेत राहुल गांधी; आरबीआयच्या माजी गव्हर्नरकडून कौतुकाचा वर्षाव
रघुराम राजन सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीका करत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचाही टीकाकार होतो.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत ग्रामीण भागातील हजारो लोक सामील झाले आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी, विचारवंत, साहित्यिक, आर्टिस्टही राहुल गांधी यांच्या या यात्रेत सामील झाले आहेत. या यात्रेमुळे राहुल गांधी यांची पप्पू ही इमेज मिटून गेली आहे. या यात्रेवरून आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी तर राहुल गांधी यांचं तोंडभरून स्तुती केली आहे. पप्पू नव्हे, स्मार्ट आहेत राहुल गांधी असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
रघुराम राजन हे दावोस येथे विश्व आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. राहुल गांधी यांना पप्पू म्हणणं दुर्देवी आहे. मी अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली आहे. जवळपास एका दशकापासून मी त्यांच्याशी चर्चा करत आहे. राहुल गांधी कोणत्याही प्रकारे पप्पू (मूर्ख) नाहीयेत. ते स्मार्ट युवा आहेत आणि जिज्ञासू व्यक्तीही आहेत, असं रघुराम राजन म्हणाले.
राहुल गांधी सक्षम
जोखीम, जबाबदारी आणि त्याचं मूल्यांकन करण्याची एखाद्या व्यक्तीत चांगली समज असावी लागते. राहुल गांधी यांच्यात ती समज आहे. त्यासाठी ते सक्षम आहेत, असं सांगतानाच मी राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. कारण भारत जोडो यात्रेच्या मूल्यांच्या मी पाठी उभा होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात प्रवेश नाही
रघुराम राजन सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीका करत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचाही टीकाकार होतो. मी भारत जोडो यात्रेत सामील झालो. कारण मी यात्रेच्या मूल्यांशी सहमत आहे. पण याचा अर्थ मी कोणत्या राजकीय पक्षात सहभागी होतोय असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
भारत जोडोत दिसले
रघुराम राजन हे 14 डिसेंबर रोजी राजस्थानात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी ते राहुल गांधी यांच्यासोबत बरंच अंतर चालत गेले होते. काँग्रेसने राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो पोस्टही केला होता. द्वेषाविरोधात आणि देश एकसंघ ठेवण्यासाठी पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावरून आम्ही यशस्वी होऊ हे दिसतंय, असं कॅप्शनही काँग्रेसने या फोटोला दिलं होतं.
काँग्रेसशी जवळीक
रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते आरबीआयचे गव्हर्नर होते. रघुराम राजन हे काँग्रेसच्या जवळचे मानले जात आहेत. राजन यांनी तीन वर्ष आरबीआयचं गव्हर्नर पद सांभाळलं होतं. त्यानंतर पुन्हा ते अकॅडमिक क्षेत्राकडे वळले होते.
