राजस्थानात कुणाचा कुणाला ताळमेळ लागेना; हायकमांड म्हणाले 102 पैकी कुणालाही मुख्यमंत्री करा…

| Updated on: Sep 26, 2022 | 2:55 PM

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे पण राजकारण ढवळून निघालं आहे ते राजस्थानातील. त्यामुळे ना गेहलोतांना, त्याचा ताळमेळ लागतोय ना काँग्रेसच्या हायकमांडला.

राजस्थानात कुणाचा कुणाला ताळमेळ लागेना; हायकमांड म्हणाले 102 पैकी कुणालाही मुख्यमंत्री करा...
Follow us on

नवी दिल्लीः देशातील राजकारणात बदल आणि काँग्रेसला (Congress) पुन्हा उभारी देण्यासाठी एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी पक्षाच्याच नेत्यांनी जोरदार कंबर कसली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अशोक गेहलोतांचे (Ashok Gehlot) नाव चर्चेत आल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री पदाचा वाद उफाळून आला आहे. सचिन पायलट (Sachin Pilot0) यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले असतानाच गेहलोत गटाने मात्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राजस्थानातील राजकारणाचा हा कळीचा मुद्दा आता काँग्रेसच्या हायकमांडपर्यंतही जाऊन पोहचला आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदावरुन सुरु झालेले राजकारण थांबायचे काही नाव घेत नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मंत्री महेश जोशी यांनी याबाबत मोठे वक्तव्य केल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

राजकारणातील मागील घटनामोडींचा संदर्भ देत सचिन पायलट यांचे नाव न घेता महेश जोशी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना आम्ही स्वीकारणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्टच सांगितले.

याबाबत आम्ही आमचा मुद्दा हायकमांडपर्यंत पोहोचवला असून हायकमांडने 102 आमदारांपैकी कुणालाही मुख्यमंत्री करा त्यामुळे आम्हाला काहीच अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्ती म्हणूनच महेश जोशींना यांना ओळखले जाते. सचिन पायलट यांच्याविषयी आपल्या गटाची भूमिका स्पष्ट करत त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा चेंडू आता काँग्रेसच्या हायकमांडच्या कोर्टात टाकला आहे.

ते म्हणाले की, याबाबतचा पुढचा निर्णय हायकमांडच घेईल. तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा जो काय निर्णय हायकमांड घेईल तेही आम्हाला मान्य असणार असंही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आमचे मत हायकमांडला ऐकून घ्यावे लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष पदावरुन चालू झालेल्या राजकीय घडामोडींना राजस्थानात प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे आमदारांचे राजीनामे नाट्य आणि इतर घडामोडींविषयीही बोलताना महेश जोशी यांनी सांगितले की, काँग्रेस फुटणार नाही, मात्र जे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना मात्र यातून संदेश मिळाला असल्याचा टोमणाही त्यांनी सचिन पायलटांना लगावला आहे

अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याबाबत जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याबाबतचा निर्णय अशोक गेहलोत यांचाच असणार आहे.

तर काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी याबाबत बोलताना म्हणाले होते की, राजस्थानमधील काही आमदार विधिमंडळ पक्षाच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिले नव्हते, त्याबरोबरच इतर कोणतीही समांतर बैठक घेणे हे अनुशासनात्मक असल्याचे माकन यांनी सांगितले होते.

राजस्थानमध्ये काल रविवारी राजकीय घडामोडींना जोरदार चर्चा झाली होती. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार होती, मात्र गेहलोत यांच्याशी निष्ठा असलेले अनेक आमदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

त्यानंतर मात्र संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर बैठक घेऊन विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी यांचीही त्यांनी भेट घेतली.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी जयपूर येथे आलेले पक्ष निरीक्षक माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे आज दिल्लीत परतणार आहेत. त्यानंतर राज्यातील सध्याच्या राजस्थानातील राजकीय घडामोडींचा अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर करणार आहेत.