काँग्रेसने केला मोठा गेम, भाजपचा बहुमत असूनही धक्कादायक पराभव, निवडणूक निकालाची देशभरात चर्चा
राजस्थानमधील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ब्यावर जिल्ह्यात बहुमत असूनही क्रॉस व्होटिंगमुळे भाजपचा पराभव झाला, तर काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला, ज्यात जैसलमेरमध्ये 21 वर्षीय संतोष कुमारी यांची बिनविरोध निवड लक्षवेधी ठरली.

बहुमत असो वा नसो प्रत्येक निवडणुकीत भाजप बाजी मारत असल्याचं चित्र गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं होतं. मात्र, आता फासे उलटे पडायला लागले आहेत. भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. राजस्थानच्या ब्यावर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेत चेअरमन पदाच्या निवडणुकीत भाजपला घाम फोडणारा झटका बसला आहे. बहुमत असूनही या निवडणुकीत भाजपचा नामुष्कीकारक पराभव झाला आहे. काँग्रेसच्या ममता गुर्जर यांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवला आहे. क्रॉस व्होटिंग झाल्याने ममता गुर्जर विजयी झाल्या आहेत. 27 जागा असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे 14 सदस्य होते. भाजपला स्पष्ट बहुमत होतं. पण बहुमत असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
राजस्थानमध्ये 37 जिल्हा परिषदांच्या चेअरमनच्या निवडणुकात होत आहेत. तीन जिल्ह्यात काँग्रेस बिनविरोध जिंकलेली आहे. दौसा, सवाई माधोपूर आणि जैसलमेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध चेअरमन झाले आहेत. जैसलमेरमध्ये 21 वर्षाची संतोष कुमारी बिनविरोध चेअरमन निवडून आल्या आहेत. बीकानेरमध्ये भाजपच्या उमेदवाराने नाव मागे घेतलं, पण काँग्रेसच्या एका बंडखोराने अपक्ष उमेदवार म्हणून नाव दाखल केलं. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थेट सामना
राजधानी जयपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना आहे. या ठिकाणी काँग्रेसकडे दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत आहे. मोठ्या बंदोबस्तात या ठिकाणी चेअरमनच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे यशवीर सूरा आणि भाजपचे राजेश गुर्जर एकमेकांच्या विरोधात आहेत. काँग्रेसला मात्र या निवडणुकीत विजयाची खात्री आहे.
21 वर्षाची चेअरमन
जैसलमेर जिल्ह्याच्या जिला परिषदेत 21 पैकी काँग्रेसचे 20 सदस्य निवडून आले आहेत. या ठिकाणी भाजपला केवळ एकच जागा मिळाली आहे. वॉर्ड नंबर 10 मधून भाजपच्या करुणा कंवर निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या संतोष कुमारी या चेअरमन झाल्या आहेत. संतोष कुमारी या अनुसूचित जनजाती समुदायातून येतात. त्या 21 वर्षाच्या असून 12 पास आहेत. अविवाहित आहेत. त्या काँग्रेसच्या तिकीटावर वॉर्ड नंबर 21 मधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार लक्ष्मी यांना 6,137 मतांनी पराभव केला आहे.
बिनविरोध निवडून आल्यानंतर संतोष कुमारी यांनी जैसलमेरमधील जनतेचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्याच्या विकासाला माझं प्राधान्य असणार आहे. निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन मी काम करणार आहे. महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जाईल. त्यांना आत्मनिर्भर करण्यावर जोर दिला जाईल, असं संतोष कुमारी यांनी सांगितलं.
