
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट जगाला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात त्यांना काही यश आलेलं नाही, त्यामुळे आता ट्रम्प हे प्रचंड निराश झाले आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक प्रस्ताव दिले, बैठका झाल्या मात्र त्यातून काहीही साध्य झालेलं नाहीये, युद्ध सुरूच आहे. त्यामुळे आता संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, आता मी यावर माझा अधिक वेळ घालू इच्छित नाही. ट्रम्प हे केवळ रशियावरच नाराज नाहीयेत, तर ते युरोपीयन राष्ट्र आणि युक्रेनवर देखील नाराज आहेत. एनबीसीच्या एका रिपोर्टनुसार युरोपीयन राष्ट्र एका प्रस्तावापासून वारंवार वाचण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये युक्रेनच्या जमिनीचा काही भाग हा रशियाच्या ताब्यात जाणार आहे.
युरोपीय राष्ट्रांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्लॅन फेटाळून लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा प्रस्ताव युक्रेनने मान्य केल्यास रशिया आणि युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम होऊ शकतो. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे, त्यांनी आता थेट युरोपीयन राष्ट्रांना तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं हे युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धापर्यंत घेऊन जाईल, मी त्यांना काही दिवसांपूर्वीच सांगितलं आहे, हा खेळ जर असाच चालू राहिला तर शेवटी तिसरं महायुद्ध अटळ आहे. तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल. माझा हा संदेश त्या सर्व राष्ट्रांना आहे, जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युक्रेन किंवा रशियाच्या बाजूनं उभे आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
एका चर्चेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, त्या लोकांना वाटतं की मी वीकेंडला बैठकीसाठी युरोपमध्ये यावं, मात्र आता मी तेव्हाच युरोपमध्ये येईल जेव्हा यामधून काही ठोस हाती लागेल. मी आता माझा वेळ वाया घालवणार नाही, अनेकदा वेळ अशी असते की लोकांना आपसात लढू द्यावं लागतं, तर काही ठिकाणी शांततेसाठी देखील प्रयत्न होणं गरजेचं असतं, असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.