5 कोटीची संपत्ती, पेशाने वकील, कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता?
दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता आली असून, रेखा गुप्ता यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी शालीमार बाग मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ABVP द्वारे झाला. त्यांनी भाजपच्या विविध पदांवर कार्य केले आहे.

राजधानी नवी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपची सत्ता आली. भाजपने आम आदमी पार्टीच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा झाली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये प्रवेश वर्मा यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्या होणाऱ्या सभारंभात त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर रेखा गुप्ता कोण याबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण?
रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सदस्या आहेत. त्यांनी विद्यार्थीदशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारे राजकारणात प्रवेश केला. यानतंर रेखा गुप्ता या १९९४-९५ मध्ये दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. १९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) सचिव झाल्या. १९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या.
रेखा गुप्ता यांनी २००३-२००४ पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्च सचिवपद भूषवले. यानंतर २००४-२००६ मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या. एप्रिल २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर उत्तर पितमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या. महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना २००७-२००९ पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली. यानंतर मार्च २०१० मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनल्या. सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
तीन वेळा दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली
रेखा गुप्ता यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली आहे. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. २०१५ मध्ये त्यांचा वंदना कुमारी यांनी सुमारे ११००० मतांनी रेखा गुप्ता यांचा पराभव केला. तर २०२० मध्ये त्यांचा पराभवाचे अंतर ३४४० इतके होते. पण आता २०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
संपूर्ण शिक्षण दिल्लीत
रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंदमधील आहेत. त्यांचे वडिलोपार्जित गाव नंदगड हे जिंदच्या जुलाना भागात आहे. त्यांचे आजोबा मणिराम आणि कुटुंबातील इतर सदस्य या ठिकाणी राहतात. रेखाचे वडील जय भगवान यांना दिल्लीत नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. रेखा गुप्ता यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीत झाले. रेखा गुप्ता या पेशाने वकील आहेत. त्यांचे लग्न १९९८ मध्ये मनीष गुप्ता यांच्याशी झाले. मनीष गुप्ता यांचा स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय आहे.
रेखा गुप्ता यांची संपत्ती किती?
रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभा २०२५ च्या निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रतिज्ञापत्रानुसार रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती सुमारे ५.३ कोटी रुपये आहे. त्यांची कमाई वकिली आणि राजकीय करिअरद्वारे होते. रेखा गुप्ता यांच्याकडे १ लाख ४८ हजार रुपये आहेत. तर त्यांच्या बँक खात्यात २२ लाख ४२ हजार २४२ रुपये जमा आहेत. याशिवाय त्यांचे अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. त्यांच्याकडे साधारण ५ कोटींची प्रॉपर्टी आहे.
रेखा गुप्ता आणि त्यांच्या पतीकडे ५३ लाख ६८ हजार ३२३ रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे. रेखा गुप्ता यांच्याकडे कोणतीही गाडी नाही. त्यांच्या पतीच्या नावावर मारुती XL6 (२०२० मॉडेल) कार आहे. रेखा गुप्ता यांचे दिल्लीतील रोहिणी परिसरात एक घर आहे, ज्याची किंमत ३० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.