हा मोदींना संदेश…सरकार हिंदुत्त्व…पहलगाम हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान!
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत सुन्न झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत सुन्न झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला असून ते भारतात परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. असे असतानाच आता काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती तथा उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. आपल्या देशात हिंदू आणि मुस्लीम यांत्यात दरी निर्माण झाली आहे. देशातील मुस्लिमांना कमकुवत असल्याचं वाटतंय, असं वाड्रा यांनी म्हटलंय.
मोदी सरकार हिंदुत्त्वाबद्दल…
रॉबर्ट वाड्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं. “या हल्ल्यामुळे मला फार दु:ख झालं आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशातील हे सरकार हिंदुत्त्वाबद्दल बोलतं. त्यामुळे अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटतं. हल्ल्याकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला समजेल की दहशतवाद्यांनी हल्ला करताना ते लोकांची ओळख पटवत होते. ते असं का करत असतील? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लीम अशी फूट पाडण्यात आली आहे,” असे मत रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केलंय.
…हा तर नरेंद्र मोदींना संदेश
तसेच, हिंदू आणि मुस्लीम अशी दरी निर्माण झाल्यामुळे भारतात हिंदूंकडून मुस्लिमांना त्रास दिला जातोय, असे या दहशतवादी संघटनांना वाटते. दहशतवाद्यांनी लोकांची ओळख पटवून नंतर त्यांच्यावर हल्ले केले. अशा प्रकारचे कृत्य करून दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संदेशच दिला आहे. आपल्या देशात आपण सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष आहोत, हे दिसले पाहिजे, अशी अपेक्षा रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली. असे घडले तर पलहगामध्ये घडलेल्या घटनांप्रमाणे देशात अन्य घटना घडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | #PahalgamTerroristAttack | Delhi | Businessman Robert Vadra says, “I feel terrible and my deepest condolences are for the people who have died in this terrorist act…In our country, we see that this government will talk about Hindutva, and the minorities feel… pic.twitter.com/Hi45M88xaK
— ANI (@ANI) April 23, 2025
मृतांमध्ये 6 जणांचा समावेश
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पहलगाममध्ये ठिकठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सध्या या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हल्ल्यात काही पर्यटक जखमीदेखील झाले आहेत. यातील ककाही पर्यंटकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे.
