बाथरूममध्ये गेली अन्…. वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या मुलीचा मृत्यू; काय घडलं नेमकं ?
पंजाबमधील शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्या 22 वर्षीय मुलीचा जालंधरमध्ये वाढदिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला. बाथरूममध्ये गीझरमधील गॅस गळतीमुळे तिचा श्वास गुदमरला. वाढदिवसाच्या उत्साहाचे रूपांतर शोकात झाले. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास करत आहेत.

पंजाबच्या जालंधरमधून अत्यंत वाईट बातमी आहे. शिवसेना नेता दीपक कंबोज यांच्या 22 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बाथरूममध्ये गीजर लिक झाल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. ज्या घरात मुलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती, तिथेच आता रडारड आणि मातम पसरलं आहे. या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
दीपक कंबोज हे पंजाबमधील शिवसेनेचे नेते आहेत. त्यांची 22 वर्षाची मुलगी मुनमुन चितवान हिचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुनमुन बाथरूममध्ये अंघोळीला गेली ती परत आलीच नाही. गीजर खराब झाला आणि संपूर्ण बाथरूममध्ये धूर पसरला. त्यामुळे मुनमुन गुदमरली. तिला बाथरूममधून बाहेर पडणंही शक्य झालं नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला.
श्वास कोंडला अन्…
बाथरूम बंद असल्याने आतमध्ये गॅस भरला गेला. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला. अचानक सर्व प्रकार झाल्याने बाथरूमची कडी उघडून बाहेर येण्याचंही तिला सुचलं नाही. गुदमरल्यामुळे ती बेशुद्ध पडली. गॅस इतका पसरला की बाथरूमच्या बाहेरही आला होता.
दरवाजा तोडला पण…
घरात गॅस दिसल्याने कुटुंबीयांनी बाथरूमच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांनी जोरजोरात दरवाजा वाजवला. पण मुनमुनकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. तिचा आवाजही बाहेर आला नाही. त्यामुळे सर्वच जण घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडून टाकला. त्यावेळी मुनमुन त्यांना बेशुद्ध पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हालचाली बंद होत्या. काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांचा तपास सुरू…
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आहे. त्यानंतर काल दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरच मुनमुनच्या मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे.
अशावेळी ती जाईल असं वाटलं नव्हतं…
दीपक कंबोज यांनी याबाबतची माहिती मीडियाला दिली आहे. आज तिचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही वाढदिवसाची मोठी तयारी केली होती. नातेवाईक आणि मित्रमंडळींना वाढदिवसासाठी आमंत्रित केलं होतं. अशावेळी मुलीचं अचानक निघून जाणं अत्यंत वेदनादायी आहे, असं दीपक कंबोज म्हणाले. मुलीच्या निधनाचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दु:खाचा डोंगरच या कुटुंबावर कोसळला आहे. मुनमुन ही शिकलेली होती. स्वभावाने मनमिळावू होती. थट्टा मस्करीही करायची, असं शेजारील लोक सांगतात.
