ज्योतिषाला भेटून योग्य वेळ विचारा आणि…, सुप्रीम कोर्टाने जोडप्याला दिला अनोखा सल्ला
सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला एक अनोखा सल्ला दिला आहे. हा सल्ला आता चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यायालयात घटस्फोटाचे अनेक खटले दाखल होत असतात. बऱ्याच वेळा पत्नीने लाखो रुपयांची पोटगी मागितल्याच्या काही बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशातच आता एका जोडप्यांमधील वैवाहिक संबंध बिघडले आणि ते घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाने जोडप्याला एक अनोखा सल्ला दिला. हा सल्ला आता चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका ज्योतिषी पती-पत्नीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, नाते तुटले आहे, त्यामुळे वेगळे होणे चांगले आहे. आता घटस्फोट घेण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी चांगली वेळ ठरवण्यासाठी ज्योतिषाला भेटा आणि त्याने सांगितलेल्या वेळी घटस्फोट घ्या. न्यायालयाने हे प्रकरण सोडवण्यासाठी जोडप्याला 4 आठवड्यांचा वेळ दिला आहे.
घटस्फोटांचे प्रमाण वाढे
काही वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता भारतातही घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जोडपी नात्यात दुरावा निर्माण झाल्यावर एकमेकांपासून वेगळे होतात. यात बड्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. भूतकाळात भारतात घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे फक्त 1 टक्के होते. मात्र आता हे प्रणाम वाढले आहे. मनीकंट्रोलच्या एका अहवालात 7 वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या भारतीयांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
लोकप्रिय डेटिंग अॅप बंबलने केलेल्या एका सर्व्हेत असे दिसून आले आहे की, सुमारे 81 % भारतीय महिलांना एकटे राहणे आवडते. तसेच इन्व्हेस्टोपेडियाने केलेल्या एका अभ्यासात सुमारे 65% नवविवाहित भारतीय जोडप्यांना मुले जन्माला घालण्याची इच्छा नाही अशी माहिती समोर आली आहे.
घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याची कारणे
घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याच्या मुद्द्यावर बोलताना रिलेशनशीप मार्गदर्शक लीना परांजपे यांनी सांगितले की, भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. जगभरातील सुमारे 70% घटस्फोट महिलांकडून सुरू होतात. पूर्वी महिला दबून रहायच्या, मात्र आता महिला त्रास होत असेल तर घटस्फोटाचा निर्णय घेतात. दीपिका राठोड म्हणतात की, आधी दबावाखाली महिला लग्न जपत असत. मात्र आता महिला त्यांच्या कुटुंबावर ओझे नाहीत. त्यामुळे त्या घटस्फोटाचा निर्णय घेऊ शकतात.
