EVM : हॅकरचे दावे आणि त्यामागचं वास्तव पाहा

मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. या सायबर एक्स्पर्टने विविध दावे केले आहेत. टीव्ही 9 मराठीने तज्ञांच्या मदतीने या …

EVM : हॅकरचे दावे आणि त्यामागचं वास्तव पाहा

मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. या सायबर एक्स्पर्टने विविध दावे केले आहेत. टीव्ही 9 मराठीने तज्ञांच्या मदतीने या सर्व दाव्यांमागचं वास्तव शोधण्याचा प्रयत्न केलाय.

काय आहेत दावे आणि त्यामागचं वास्तव?

दावा : 2014 च्या निवडणुकीसाठी ईव्हीएम तयार करणाऱ्या टीममध्ये माझाही समावेश होता. भाजपने या निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड केली.

वास्तव : ईव्हीएम तयार करणारी कंपनी ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते, या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंध नव्हता. याबाबतची माहिती कंपनीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दिली आहे.

दावा : ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने लो फ्रिक्वेन्सी सिग्नल देऊन मदत केली.

वास्तव : मुळात ईव्हीएम हे कॅलक्युलेटरसारखं यंत्र आहे. यामध्ये वायफाय किंवा कनेक्टिव्हिटीचा संबंध नसतो. केवळ केबलने बॅलेट बॉक्स आणि ईव्हीएम जोडलेलं असतं. निवडणूक आयोगाने अनेकदा हे स्पष्ट केलंय, की ब्ल्यूटूथ, वायफाय किंवा कोणतंही नेटवर्क ईव्हीएमशी कनेक्ट करता येत नाही.

दावा : ईव्हीएम छेडछाडीबाबत गोपीनाथ मुंडेंनी माहिती होती. त्यामुळेच त्यांना मारण्यात आलं.

वास्तव : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या मते, “गोपीनाथ मुंडेंचे निधन कार अपघातात झालं. शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमोर्टम केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याचं सांगितलं होतं. गोपीनाथ मुंडे आमचे मोठे नेते होते, त्यांच्याबाबत अशाप्रकारचा आरोप करणं अशोभनीय आहे.

दावा : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करणारा एनआयएचा अधिकारी हत्येचा गुन्हा दाखल करणार होता, पण त्या अधिकाऱ्याचीही हत्या करण्यात आली.

वास्तव : गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर चौकशी सीबीआयकडे देण्यात आली होती. एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था ही वेगळी संस्था आहे. त्यामुळे सीबीआयकडे चौकशी असताना एनआयएचा अधिकारी हत्येचा गुन्हा का दाखल करेन, असाही प्रश्न उपस्थित होतो.

दावा : भाजपशिवाय काँग्रेस, सपा, बसपा आणि आपनेही ईव्हीएम हॅक करण्याबाबत विचारणा केली होती.

वास्तव : सपा आणि बसपाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर भाजपवर ईव्हीएम छेडछाडीचा आरोप केला होता. शिवाय काँग्रेसनेही स्वतः भाजपवर अनेकदा ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा आरोप केलाय. ईव्हीएम हॅकिंग आणि आमचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण आपनेही दिलंय. आपने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या.

दावा : मी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड होऊ दिली नाही. अन्यथा ही राज्यही भाजपने जिंकली असती.

वास्तव : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा निकाल पाहिला तर विविध प्रश्न निर्माण होतात. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केलाय, तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसलाही बहुमत मिळालं नाही.

दावा : 2014 च्या निवडणुकीसाठी ईव्हीएम तयार करणाऱ्या टीममध्ये माझाही समावेश होता.

वास्तव : 2009 ते 2014 या काळात जे ईव्हीएम तयार केले, त्या टीममध्ये सईद शुजा नावाच्या एकाही व्यक्तीचा संबंध नाही किंवा तो कधी कंपनीचा कर्मचारीही नव्हता, असं स्पष्टीकरण ईसीआयएलने दिलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *