Tahawwur Rana : हो, तहव्वूर राणाला भारतात फाशीची शिक्षा होऊ शकते, पण एक मोठा पेच
Tahawwur Rana : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेतून भारतात आणलं. हा आपला कूटनितीक विजय नक्कीच आहे. पण या दहशतवाद्याला आता भारतात फाशीची शिक्षा होऊ शकते का? हा आज प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रश्न आहे. अबू सालेमला फाशीची शिक्षा देता आली नव्हती. पण तहव्वूर राणाला फाशी होऊ शकते. फक्त एक मोठा पेच आहे.

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर हुसैन राणाला भारतात आणण्यात आलं आहे. तहव्वूर राणाने मुंबई हल्ल्यात रेकी करण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. तहव्वूर राणाला भारतात आणण्याची मोठी प्रक्रिया संपल्यानंतर त्याला आता शिक्षा देण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. तहव्वूर राणाला गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता एका स्पेशल फ्लाइटने भारतात आणण्यात आलं. विमानाने, पालम एअरपोर्टवर लँडिंग करताच सर्वप्रथम NIA च्या टीमने त्याला 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात अटक केली. त्यानंतर एअर पोर्टवरच त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्याला थेट कोर्टात नेण्यात आलं. तिथे वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी NIA ची बाजू मांडली.
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणातील दोषी अजमल कसाबला भारतीय कायद्यानुसार फाशी झाली. आता या रांगेत तहव्वूर राणा आहे. मागच्या 16 वर्षांपासून तहव्वूर राणाला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा होऊ शकते का? आज प्रत्येक भारतीयाला या प्रश्नाच उत्तर हवं आहे. तहव्वूर राणाचा वाचणं कठीण आहे. कारण NIA त्याच्याविरुद्ध एक मजबूत केस बनवणार. ज्यामुळे त्याला लवकरात लवकर शिक्षा होऊ शकते.
NIA अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA मुख्यालयात तहव्वूर राणाच्या चौकशीसाठी एक खास खोली बनवण्यात आली आहे. त्यात केवळ 12 जणांना जाण्याची परवानगी असेल. यात एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांचे बडे अधिकारी असतील. ज्यांना कोणाला तहव्वूर राणाशी बोलायचं असेल, त्याआधी NIA अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. NIA तहव्वूर राणाला मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याशी संबंधित काही खास फोटो, व्हिडिओ, ईमेल आणि काही Voice Recordings ऐकवणार आहे, त्यानंतर त्याच्याशी प्रश्नोत्तर सुरु होतील.
अमेरिका-भारतामधील गुन्हेगार प्रत्यर्पणाचा करार काय आहे?
प्रत्यर्पणच्या सर्व नियमांच पालन करुन तहव्वूर राणा विरोधात सुनावणी होईल. यात एक प्रश्न आहे की, तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा होऊ शकते का?. तुम्हाला आठवत असेल, तर अबू सलेमला प्रत्यर्पणाद्वारे पोर्तुगालवरुन भारतात आणण्यात आलं. प्रत्यर्पण करारातंर्गत हे ठरलं होतं की, त्याला फाशीची शिक्षा होणार नाही. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो तुरुंगात बंद आहे. अबू सालेमच्या प्रकरणात त्याला पोर्तुगालमध्ये अटक झालेली. पोर्तुगालमध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद नाहीय. म्हणून भारतात आणल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली नाही. आता प्रश्न हा आहे की, तहव्वूर राणाच्या बाबतीत काय होणार? त्यासाठी आपल्याला भारत आणि अमेरिकेत गुन्हेगार प्रत्यर्पणाचा जो करार झालाय, तो समजून घ्यावा लागेल.
अबू सालेमला का फाशी देता आली नव्हती?
भारत आणि अमेरिकेत जो गुन्हेगार प्रत्यर्पण करार आहे, त्यानुसार अनुच्छेद-8 च्या कलम 1 नुसार ज्या गुन्ह्यात प्रत्यर्पणाची मागणी करण्यात आली आहे, जर प्रत्यर्पणाची मागणी करणाऱ्या देशात त्या गुन्ह्यासाठी मृत्यूच्या शिक्षेची तरतूद आहे, पण प्रत्यर्पण करणाऱ्या देशात मृत्यूच्या शिक्षेची तरतूद नाहीय, तर प्रत्यर्पणाची मागणी करणारा देश मृत्यूची शिक्षा देऊ शकत नाही. पोतुर्गालमध्ये मृत्यूच्या शिक्षेची तरतूद नाहीय. त्यामुळे अबू सालेमला फाशीची शिक्षा देता आली नाही.
तहव्वुर राणाला फाशी देण्यात पेच काय?
तहव्वुर राणाच दुर्देव हे आहे की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशात मृत्यूच्या शिक्षेची तरतूद आहे. दोन्ही देशात गुन्हेगारांना मृत्यूची शिक्षा दिली जाते. नियमानुसार भारतात तहव्वुर राणाला फाशीची शिक्षा होऊ शकते. तहव्वुर राणाला अमेरिकेकडून प्रत्यार्पित करण्यात आलं असलं, तरी त्याला फाशीची शिक्षा देण्यात पेच हा आहे की, तो कॅनेडाई नागरिक आहे. कॅनडात मृत्यूच्या शिक्षेची तरतूद नाहीय. असं पाहण्यात आलय की, जेव्हा कुठल्या देशात कॅनडाच्या नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते, तेव्हा कॅनडा त्या शिक्षेविरोधात अपील करतो, तहव्वुरच्या केसमध्ये सुद्धा असच घडू शकतं.