भाजपात प्रचंड मोठी खळबळ, बडा नेता थेट नवा पक्ष काढणार; पडद्यामागे हालचाली वाढल्या!
तामिळनाडूत भाजपाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडू भाजपातील युवा नेते अण्णामलाई हे लवकरच भाजपाशी फारकत घेत आपला नवा पक्ष काढण्याची शक्यता आहे.

तमिळनाडूमध्ये अभिनेता थलापती विजय यांच्या नेतृत्त्वात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. थलापती विजय हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आहे. नव्या सरकारची स्थापना झालेली असली तरीही तामिळनाडूतील राजकारणात आलेलं उधाण मात्र अजूनही ओसरत नाहीये. नवा पक्ष काढून विजय थलापती थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत. असे असतानाच आता या राज्यात आणखी एक नवा पक्ष स्थापन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा पक्ष एखादा अभिनेता, अभिनेत्री काढत नाहीये. तामिळनाडू भाजपातील दिग्गज नाव असलेले युवा नेते अण्णामलाई हे लवकरच नवा पक्ष काढण्याची शक्यता आहे.
कोईम्बतूर शहरात अनेक ठिकाणी पोस्टर्स
तामिळनाडूत भाजपाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडू भाजपातील युवा नेते अण्णामलाई हे लवकरच भाजपाशी फारकत घेत आपला नवा पक्ष काढण्याची शक्यता आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तामिळनाडूतील कोईम्बतूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लागलेले आहेत. या पोस्टरवर Fearless minds gave no limits अशा प्रकारचे घोषवाक्य इंग्रजीत लिहिलेले आहे. कशाहीची भीती नसलेल्या विचाराला कोणत्याही सीमा नसतात, असे या पोस्टरवर लिहिलेले आहे. तसेच या पोस्टरवर अण्णामलाई यांचा फोटो दिसत आहे.
नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत नेमकं काय म्हणाले?
अण्णामलाई हे तामिळनाडूच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. विशेष म्हणजे अण्णामलाई यांच्या आगामी राजकीय प्रवासाबद्दल त्यांना विचारण्यात आले. त्यांनीदेखील नव्या पक्षाच्या स्थापनेची शक्यता नाकारलेली नाही. दोन दिवस थांबा. दोन दिवसांनी आम्ही तुमच्यासमोर येतो. मग सगळं सांगतो, असं अण्णामलाई म्हणाले आहेत.
भविष्यात नेमकं काय घडणार?
दरम्यान, अण्णामलाई यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नुकतेच भेट घेतली आहे. लवकरच तामिळनाडूत राज्य केंद्रीय समितीची एक बैठक होणार आहे. या बैठकीआधीच अण्णामलाई यांनी नितीन नबीन यांच्याशी दिल्लीत चर्चा केल. दुसरीकडे अण्णामलाई यांच्या ‘अन्नामलाई अन्बू कूट्टम’ या सामाजिक संस्थेत नवे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची नोंदणी चालू झालेली आहे. या सर्व घडामोडी घडत असल्याने आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.