मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून PM मोदींच्या पावलावर पाऊल… थेट घोषणाच केली
CM Vijay : थलापती विजय यांनी विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केल्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठी घोषणा केली.

तामिळनाडूच्या राजकारणाला आता नवे वळण मिळाले आहे. अभिनेते थलापती विजय यांनी विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केल्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज शपथविधीनंतर सर्वांना पंतप्रधान मोदांचा 12 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. टीव्हीके (TVK) सुप्रीमो थलापती जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जे शब्द उच्चारले, त्यांनी केवळ तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. विजय यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
विजय यांचे मोदींच्या पावलावर पाऊल
थलापती विजय यांनी आज चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी थेट जनतेच्या भावनांना हात घातला. विजय म्हणाले, ‘आजपासून मी फक्त माझ्या पक्षाच्या समर्थकांचा नेता नाही. कुणी मला मत दिले असेल किंवा नसेल, तामिळनाडूतील 8 कोटी जनता हेच माझं कुटुंब आहे.’ हे शब्द अगदी तसेच होते, जसे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांना आपले कुटुंब म्हटले होते. राजकीय जाणकारांच्या मते, विजय यांनी ‘कुटुंब’ हा मुद्दा उपस्थित करून स्वतःला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेऊन जननेता म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आज ‘विजय-विजय अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते. लाखोंची गर्दी, थलापतीचे चाहते, सामान्य जनता आणि राहुल गांधींसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या दशकांपासूनच्या राजकीय संघर्षाला छेद देत टीव्हीकेचा उदय झाला आहे.
मुख्यमंत्री बनताच 3 मोठे निर्णय
शपथविधीनंतर मुख्यमंत्री विजय तात्काळ सचिवालयात पोहोचले आणि वेळ न दवडता आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील तीन महत्त्वाच्या आश्वासनांवर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.
विजय यांनी पुढे तामिळनाडूमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येला लक्षात घेऊन विजय यांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. ड्रग्सचे जाळे पूर्णपणे मोडून काढण्यासाठी विशेष कार्यबल स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच राज्यात महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी पोलीस विभागांतर्गत विशेष विंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही युनिट थेट मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO) अहवाल देणार आहे.