तुम्हाला चव येण्यासाठी यांचे जीवन होते बेचव, मेल्यानंतरही यांचे पाय जळत नाहीत…
आमच्या लहान मुलांना देखील आता हेच काम करावे लागणार.त्याचे वय आता लहान आहे, पण करणार काय पुढे जाऊन त्यांनाच तर हे सांभाळावे लागणार आहे. अगरिया म्हणून काम करणारी महिला आपली व्यथा सांगत होती.

या जगात जो जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस मरण येणारच आहे, हे त्रिवार सत्य आहे. जो जन्माला येतो त्याला मरण येणारच आहे. शरीर नश्वर असल्याने प्रत्येक मानवाचे शरीर मेल्यानंतर पंचतत्वात विलीन होत असते. परंतू काही अभागी असे आहेत त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे हाल संपत नाहीत. कारण या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांची या कष्टातून सुटका होत असली तरी त्यांचे पाय मात्र जळत नाहीत….
गुजरातमध्ये मीठाची शेती करणारे मजूराचे शरीर या मीठाला इतके सरावले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे पाय जळत नसल्याचे धक्कादायक सत्य सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओले करणारे आहे. त्यामुळे स्मशानात लाडकाबरोबर इतर अवयवांची राख होत असली तरी त्यांचे पाय शिल्लक राहातात. त्यामुळे शरीराच्या या उरलेल्या भागाला मिठा सोबतच जमीनीत खड्डा पुरुन गाडले जाते. मीठाच्या उत्पन्नासाठी आपले आयुष्य खर्चणाऱ्या मजूरांची ही भयानक स्थिती आहे. बराच काळ मीठात काम केल्याने या मजूरांनी अल्सर आणि त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार, पायाला आणि शरीराला होणाऱ्या जखमा यांचा सामना करावा लागतो.
गुजरातच्या कच्छमध्ये मीठ तयार केले जाते. तेथील मिठागरात मीठ तयार करणाऱ्यांना लोकांना अगरिया म्हटले जाते. आपल्या जेवणाला चव यावी म्हणून पिढ्यान पिढ्या राबणाऱ्या आणि मीठाचे उत्पन्न घेणाऱ्या या मजूराच्या जीवनातील चव निघून गेली आहे. त्यांच्याकडे काही काम नाही म्हणून हे जीवघेणे काम त्यांना करावे लागत असल्याचे त्यांनी बीबीसी बोलताना म्हटले आहे.
कोण आहेत हे अगरिया लोक
मीठ बनवणाऱ्या या मजूरांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना गुजरात येथे अगरिया म्हणतात. मान्सून संपल्यानंतर अगरिया आपले घर सोडतात.वर्षांचे नऊ महिने आपले घर सोडून मीठ तयार करण्यासाठी हे लोक गांधीधाम, जोगनीनार सारख्या भागात जातात.
पिढ्यांपासून हेच काम ..
मीठ तयार करणाऱ्या एका मजूराने सांगितले की त्याचे वडीलही मीठ तयार करायचे आणि त्याचे आजोबाही हेच काम करायचे. या मजूराने सांगितले की त्याचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले. त्यामुळे पुढे कोणतेही चांगले कमा मिळाले नसल्याने आपण मीठ तयार करण्याचे काम करु लागलो.त्याने सांगितले की त्याचा मुलालाही मीठ तयार करावे लागत आहे.
बूट आणि हातमोज्यांशिवाय करतात काम
मीठ बनवण्याच्या या कामाने इतका पैसा मिळत नाही की माझ्या मुलाला शिक्षण देऊ शकेल. त्यामुळे आम्हाला मीठ तयार करावेच लागते. मीठ बनवताना येणाऱ्या अडचणी सांगताना त्यांनी सांगितले की मीठामुळे आमचे पाय खराब होतात. आम्ही बूट किंवा चप्पल घालतो. परंतू जास्त दिवस ते टीकत नाहीत.
मेल्यानंतर देखील पाय जळत नाही
मीठात काम केल्याने आमच्या पायाची चामडी इतकी जाड होते की मेल्यानंतरही ती जळत नाही. मेल्यानंतरही पाय जळत नाहीत. मग एक खड्डा खणून त्यांना मीठ टाकून गाडावे लागते.त्याआधी आयुष्य भर पायांना भेगा पडतात आणि जखमांमुळे त्रास सहन करावा लागतो अशी व्यथा ते सांगतात.
केवळ पायच नाहीत तर शरीरही सडते
एका अगरिया महिलेने सांगितले मीठामुळे संपूर्ण शरीरात जळजळ होते. डोळे चुरचुरतात. पाय सून्न पडतात, परंतू काम तर करावेच लागते. कारण जर मीठ तयार नाही केले तर खाणार काय ? मीठ बनवण्यासाठी अगरिया यांची पुढची पिढी देखील हळूहळू याच कामाला जुंपली जाते.
मुलांची चिंता
या महिलेने सांगितले की मुलांचे वय तर लहान आहे. परंतू करणार काय ? काम तर करावेच लागते. कारण पुढे जाऊन त्यांनाच हे सांभाळायचे आहे. काम नाही केले तर खाणार काय ? कमी वयात हे काम केल्याने नुकसान जास्त होते. केवळ पायच नाही कर हात,डोळे आणि शरीराचे इतर अवयवांवर देखील परिणाम होतो.
