सेंकड AC तून प्रवास करताना वृद्धेने उशाजवळ ठेवले हिऱ्यांचे दागिने, तरीही चोरट्याने डल्ला मारला, अखेर पोलिसांनी…

इंदूर-दौंड एक्सप्रेसमध्ये सुमारे ३५ लाखांचे दागिने एका वृद्धेच्या उशाजवळून पळवणाऱ्या एका चोराला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करुन हा मुद्देमाल संबंधित दाम्पत्याला परत केला आहे.

सेंकड AC तून प्रवास करताना वृद्धेने उशाजवळ ठेवले हिऱ्यांचे दागिने, तरीही चोरट्याने डल्ला मारला, अखेर पोलिसांनी...
| Updated on: Jun 28, 2025 | 9:21 PM

लोणावळा येथील एका धार्मिक भागवत कथेच्या कार्यक्रमाला इंदूरला राहणारे एक वृद्ध दाम्पत्य ट्रेन क्रमांक 22944 इंदौर – दौंड एक्सप्रेसने निघाले होते.  एसी सेंकडमधून प्रवास करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याकडे हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्यांचा हार, अंगड्या, सोन्याचे घड्याळ आणि चेन आणि रोख रक्कम होती. ७३ वर्षीय वृद्धेने चोरांच्या भीतीने हा ऐवज झोपताना आपल्या उशाजवळ ठेवला होता. तरीही चोरी झाल्याचे २० जूनच्या सकाळी लोणावळा येथे पोहचल्यावर समजले. वृद्धेला तिची हँडबॅग नाहीशी झाल्याचे समजताच धक्का बसला.

त्यानंतर वृद्धेचा नवरा अत्यंत तणावाखाली आला आणि दु:खी झाला. त्यांनी रेल्वेची हेल्पलाईन १३९ वर कॉल केला आणि संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. लोणावळा जीआरपीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफने वेगवेगळ्या टीम स्थापन करुन तपास सुरु केला. इंदौर, देवास, उज्जैन, नागदा, खाचरौद, रतलाम, मेघनगर, दाहोद, गोध्रा, वडोदरा, सूरत, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण, कर्जत,लोणावला, चिंचवड, पुणे आणि दौंड असा या ट्रेनचा मार्ग असल्याने सर्व स्थानकांची सीसीटीव्ही तपासण्यात आले.

तपासात असे निष्पन्न झाले की एक व्यक्ती कल्याण स्थानकात या डब्यातून घाईघाईत उतरल्याचे दिसले. त्याचा सीसीटीव्हीवर माग घेतला असता तो सीसीटीव्हींना चुकवत सावधपणे जात असलेला दिसला. पुढे तपासात असे उघड झाले की तो सराईत चोरटा होता. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्याला चोरीच्या गुन्ह्यात जामीन मिळाला होता. पोलीसांनी त्याच्या घरावर छापा मारला आणि सर्व चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीला अटक

गुन्ह्याचे कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी केवळ सीसीटीव्हींच्या मदतीने या आरोपीला अटक केले. आरोपी महेश अरुण घाग उर्फ विक्की याला अटक केली आहे. आरोपी हा चेंबुरचा रहिवासी असून त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रवाशांनी प्रवासात सावध असावे आणि कोणताही प्रकार घडल्यास हेल्पलाईन क्रमांक १३९ ला माहीती द्यावी अशी विनंती रेल्वेने केली आहे.