Tukaram Mundhe: राष्ट्रपतींच्या आवाहनानंतर तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींना इशारा; थेट म्हणाले, अशा गोष्टी..
Tukaram Mundhe: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेलिब्रिटींना जाहिरातींबद्दल आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. राष्ट्रपतींचा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले..

महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध कलाकारांना आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचं समर्थन न करण्याचं आवाहन केल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सेलिब्रिटींना कायद्याची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘प्रभाव असणं म्हणजे कायद्यापासून सूट मिळणं नव्हे’, असा संदेश दिला. कलाकारांनी इतर नागरिकांप्रमाणेच कायद्याचा आदर केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.
तुकाराम मुंढे यांची पोस्ट-
‘प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असणं म्हणजे कायद्यापासून सूट मिळणं नव्हे. कलाकारांनी इतर सर्वांप्रमाणेच कायद्याचा आदर केला पाहिजे आणि उत्पादनं, वर्तन आणि सवयींचं समर्थन करताना त्यांच्यावर असलेली जबाबदारी ओळखली पाहिजे. कारण अशा गोष्टींचा थेट परिणाम लोकांच्या निवडीवर आणि निर्णयांवर होत असतो. जेव्हा प्रभावशाली व्यक्ती अन्नपदार्थांच्या उत्पादनांचं समर्थन किंवा जाहिरात करतात, तेव्हा सार्वजनिक आरोग्याचा विचार दुय्यम ठरता कामा नये,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटलंय, ‘महाराष्ट्रात व्यापक जनहिताच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणाऱ्या काही उत्पादनांच्या जाहिराती केल्याबद्दल आम्ही यापूर्वीच कलाकारांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. आपल्या प्रभावाचा वापर असा काही प्रचार करण्यासाठी होता कामा नये, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तत्त्व अगदी स्पष्ट आहे, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणत्याही व्यावसायिक हिताला सार्वजनिक आरोग्यापेक्षा अधिक महत्त्व देता येणार नाही.’
पहा व्हिडीओ-
Influence is not immunity.
Artists, like everyone else, must respect the law and recognise the responsibility that comes with endorsing products, behaviours and habits that shape public choices.
When influence is used to endorse food products, public health cannot be an…
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 23, 2026
शाहरुख, अजय, टायगरला नोटीस
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 11 ऑगस्ट रोजी विमल इलायचीच्या जाहिरातीसंदर्भात एफडीएकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या जाहिरातीमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ जाहिरात होत असल्याचा प्रथमदर्शनी आक्षेप आहे. या नोटिसांमध्ये संबंधित कलाकारांना जाहिरातीतील सहभाग थांबवण्यास तसंच त्यांच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संबंधित प्रमोशनल कंटेंट हटवण्यास सांगण्यात आलं होतं.
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या प्रभावाचा उल्लेख करत तरुणांवर त्यांच्या वर्तनाचा आणि संदेशांचा परिणाम होत असल्याचं सांगितलं होतं. प्रसिद्ध कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचं समर्थन करू नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
