यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जंतरमंतर येथे आंदोलकांची भेट घेऊन केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला. लोकशाहीत जनतेशी संवाद साधणे आवश्यक असून, सध्याचे सरकार क्रूरपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. "आज जे सत्तेत आहेत, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ती काढायला जनतेला वेळ लागणार नाही," असा इशारा देत, सरकार हुकूमशाही वृत्तीने वागत असल्याचे ठाकरे म्हणाले.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 10:49 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एक गोष्ट स्पष्ट करतो, फक्त काल या आंदोलनाला पाठिंबा दिला असं नाही. पहिल्या दिवसापासून माझा आंदोलनाला पाठिंबा आहे. काल मी सर्वांना भेटायला आलो होतो. योगायोग म्हणजे राहुल गांधींनीही काल आंदोलन केलं. सरकार क्रूरपणे वागत आहे. ही लोकशाही नाही. आता लोक म्हणत आहेत की, यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. आज जे सत्तेत आहेत, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ही हवा काढण्यासाठी जनतेला वेळ लागणार नाही, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

मी केवळ अभिजीत आणि इतर तरुणांना भेटायला आलो होतो. आता बघू पुढे काय करायचं आहे. जर कोणीही आंदोलन केलं तर सरकारने त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांचा काही संभ्रम असेल तर त्यांचा संभ्रम दूर केला पाहिजे. हे सरकारचं काम आहे. अभिजीत आणि सोनम वांगचुक यांच्याशी पहिल्याच दिवशी सरकारने चर्चा केली असती तर आज ही वेळ आली नसती.

तर ही लोकशाही नाही

मी यापूर्वी इंदिरा गांधी आणि अण्णा हजारे यांचं उदाहरण दिलं होतं. वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते. तेव्हा इंदिरा गांधी त्यांना भेटले होते. तर अण्णा हजारे यांना भेटायला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव गेले होते. तुम्ही जबरदस्तीने तुमचं म्हणणं लादत असाल आणि लोकांचं म्हणणं ऐकत नसाल तर ही लोकशाही नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राजीनामा मागण्यात गैर काय?

काल मी पाहिलं. 9 ते 10 वर्षाच्या मुली आणि महिलांशी ज्या पद्धतीने वागले, निश्चितच ही हिंदु संस्कृती नाही. हे रावण राज नाहीये. एक व्यक्ती महत्तावाचा आहे, की जनता महत्त्वाची आहे, हे कळलं पाहिजे. तसेच मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत, त्यात गैर काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

बोलायला कमीपणा वाटतो का?

या मुलांना आधाराची गरज आहे. हा आधारच तुम्ही तोडून मोडून टाकणार असाल तर ही हुकूमशाही आहे. तुम्ही लोकशाही मानत असाल तर त्यांच्याशी बोलायला कमीपणा का वाटावा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Follow Us