बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला

बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला
yogi adityanath akhilesh yadav

पश्चिम बंगालमध्ये सत्तेचं स्वप्न भंगल्यानंतर आता भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा झटका बसला आहे. (UP Panchayat Result: Ayodhya, Mathura, Kashi Bjp Lose, Sp-Bsp Won)

भीमराव गवळी

|

May 04, 2021 | 11:17 AM

लखनऊ: पश्चिम बंगालमध्ये सत्तेचं स्वप्न भंगल्यानंतर आता भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्यापासून ते मथुरा आणि काशीसहीत अनेक जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकून भाजपच नंबर वन असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीचे संपूर्ण आकडे आल्यावरच राज्यात कोण नंबर वन आहे हे दिसून येणार आहे. (UP Panchayat Result: Ayodhya, Mathura, Kashi Bjp Lose, Sp-Bsp Won)

रामनगरीतच पराभव

राम नगरी अयोध्येत भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. अयोध्येतील एकूण जिल्हा पंचायत समितीच्या 40 जागा आहेत. त्यापैकी 24 जागांवर समाजवादी पार्टीचा विजय झाला आहे. तसा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. तर राम नगरी अयोध्येत भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी 12 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. बंडखोरीमुळे भाजपला हा फटका बसल्याचं सांगितलं जातं. तिकीट न मिळाल्याने 13 जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. दुसरीकडे सर्व अपक्ष उमेदवार भाजपच्या सोबत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

मोदींच्या काशीत सपाचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणासीतही भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपला मोठा फटका बसला आहे. काशीत जिल्हा पंचायत समितीच्या एकूण 40 जागा आहे. त्यापैकी केवळ आठ जागांवरच भाजपला विजय मिळाला आहे. तर समाजवादी पार्टीला 14 आणि बसपाला पाच जागांवर विजय मिळाला आहे. तर वाराणासीमध्ये अपना दल (एस)ला तीन जागांवर विजय मिळाला आहे. आम आदमी पार्टी आणि ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्याशिवाय तीन अपक्षही विजयी झाले आहेत. 2015मध्ये भाजपला काशीमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र, योगी सरकार आल्यानंतर भाजपने काशीमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.

कृष्ण नगरीत बसपाचं वर्चस्व

भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून ओळख असलेल्या मथुरा जिल्ह्यात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मथुरेत बहुजन समाज पार्टीने बाजी मारली आहे. मथुरेत बसपाचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. तर आरएलडीचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. सपाने एकाच जागेवर विजय मिळवला आहे. तर तीन अपक्षांनाही विजय मिळाला आहे. मथुरेत काँग्रेसचा सफाया झाला आहे. स्वत: काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा पराभव झाला आहे. दरम्यान, मथुरेतील अपक्षही आपल्याच सोबत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

2022ची लिटमस टेस्ट?

भाजपच्या स्थापनेपासूनच भाजपच्या अजेंड्यावर अयोध्या, मथुरा, काशी राहिली आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या नावावर केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात भाजपने राजकारण केलं आहे. अशावेळेस या तिन्ही जिल्ह्यातील पंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणं याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. मोदींच्या मतदारसंघातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मथुरेत बसपा नंबर वन ठरली असून यातून मायावतींचा राजकीय प्रभाव अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे.

2022मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकांकडे विधानसभेची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे. कोणत्याही पक्षाची खरी ताकद ही पंचायत समितीत असते. त्यातूनच राज्याच्या निकालाचे आडाखे बांधले जातात. त्यामुळेच या निकालाने भाजपची झोप उडाली असून 2022मध्ये काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (UP Panchayat Result: Ayodhya, Mathura, Kashi Bjp Lose, Sp-Bsp Won)

संबंधित बातम्या:

टाळी एका हाताने वाजत नाही; बंगालमधील हिंसेवरून राऊतांनी भाजपला फटकारले

“भाजप नेत्यांचा ‘उद्धटपणा’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण, महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवावे”

‘बाळासाहेबांचे आशीर्वाद नसता तर महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते’, अरविंद सावंतांचा भाजपला टोला

(UP Panchayat Result: Ayodhya, Mathura, Kashi Bjp Lose, Sp-Bsp Won)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें