“भाजप नेत्यांचा ‘उद्धटपणा’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण, महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवावे”

भाजपच्या पराभवाचे थडगे नंदीग्राममध्येच बांधले गेले, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.(Shivsena Saamana Editorial On Chandrakant Patil) 

भाजप नेत्यांचा ‘उद्धटपणा’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण, महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवावे
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:10 AM

मुंबई : “ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याबद्दल प्रत्युत्तर करण्यात आले आहे. (Shivsena Saamana Editorial On Chandrakant Patil threat to chhagan bhujbal)

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय?

ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभणारे तसेच परवडणारे नाही

छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यात काय चुकलं? पाकिस्तानात सत्तांतर होते तेव्हा पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचार आहे, पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले असल्याची आठवण करून दिली. पाटलांनी भुजबळांना इतर बऱ्याच धमक्या आणि इशारे दिले. थोडक्यात काय, तर भुजबळांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे पाटील यांना सुचवायचे आहे का? हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. भुजबळ हे पाटलांना उत्तर देण्यास समर्थ आहेत, पण याचा एकच अर्थ घ्यायला हवा तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयम-संस्कार व संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभणारे तसेच परवडणारे नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी दिग्विजय मिळवलाच आहे व बंगाल काबीज करण्यासाठी जे गेले ते बंगालच्या खाडीत गटांगळय़ा खात आहेत. हे चित्र तुम्ही कसे बदलणार? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

भाजपवाल्यांची डोकी ममतांच्या विजयामुळे कामातून गेली

ममता बॅनर्जी यांनी 216 जागा जिंकण्याचा चमत्कार केला याबद्दल त्यांचे अभिनंदन सगळेच करीत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांचे जाहीर अभिनंदन केले. आता मोदी, शहा, राजनाथ सिंहांवरही चंद्रकांतदादा राग राग करणार की ममतांचे अभिनंदन केले म्हणून गुजरातमधल्या जुन्या प्रकरणांची थडगी उकरून काढण्याच्या धमक्या देणार? तिकडे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनीही ममता यांना शुभेच्छा देण्यास तर नकार दिलाच, पण प. बंगालच्या जनतेने भ्रष्ट आणि क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली, असे तारेदेखील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तोडले. त्यावर चौफेर टीका होऊ लागताच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र भाजपवाल्यांची डोकी ममतांच्या विजयामुळे कशी कामातून गेली आहेत याचाच हा पुरावा आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली.

भाजपच्या पराभवाचे थडगे नंदीग्राममध्येच बांधले गेले

राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात. वर खाली होतच असते. महाराष्ट्रातील पंढरपूर पोटनिवडणूक भाजप जिंकले, पण बंगालात आपटल्यामुळे पंढरपूरचा विजयही त्यांना गोड वाटत नाही. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अटीतटीच्या लढतीत पडला. तेथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. हा लोकशाहीचा कौल सगळ्य़ांनीच मान्य केला. त्याबद्दल विरोधकांनीही भाजप आणि आवताडे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. पंढरपुरात जिंकलेल्या आवताडे यांचे अभिनंदन करणाऱ्यांना बघून घेऊ, अशी भाषा कोणी केल्याचे दिसत नाही. मुळात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कौल पाहता बलदंड भाजपच्या हाती फार काही लागले आहे असे दिसत नाही. आसामातील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पाहता तेथे भाजप विजयास पर्याय नव्हता.

केरळ, बंगाल, तामीळनाडूत त्या पक्षाचा सुपडा साफच झाला. पुद्दुचेरीत मोडतोड तांबा पितळ झाले आहे. आता भाजपचा आनंद कशात तर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्या यात. नंदीग्रामच्या हिमतीचेही देशात कौतुक आहे. नंदीग्रामची जागा कठीण किंवा गैरसोयीची आहे म्हणून ममता दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघात उभ्या राहिल्या नाहीत. इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, मायावती, मुलायम यादवांसारखे नेते एकाचवेळी दोन दोन मतदारसंघातून उभे राहिले. हे सुरक्षित राजकारण ममता बॅनर्जी यांनी केले नाही. त्यांनी आव्हान स्विकारले व त्याचाही बंगाली जनतेच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ममतांचा हाच बेडरपणा बंगाली जनतेला आवडला. भाजपच्या पराभवाचे थडगे नंदीग्राममध्येच बांधले गेले, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे

आज प. बंगालातून भाजपची पळताभुई थोडी झाली. ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? प. बंगालवर विजय मिळवताच महाराष्ट्राकडे फौजा वळवू असे स्वप्न काही लोक पाहत होते. पंढरपूरच्या विजयाने त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटलेच असते, पण महाराष्ट्र राज्याचे पुण्य कामी आले व बंगालात ममतांचा मोठा विजय झाला. त्याची आदळआपट दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातच जास्त सुरू आहे. प्रकरण धमक्या आणि इशारे देण्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.

भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास हीच असहिष्णुताच जबाबदार

महाराष्ट्राची राजकीय परंपरा व संस्कृतीचा अभ्यास कच्चा असल्याने हे घडत आहे. विरोधी मतांचा आदर करण्याची परंपरा या मातीची आहे. येथे तुकोबांची सत्य वाणी चालते. मंबाजीचे ढोंग चालत नाही. पंढरपुरात भाजपचा विजय झाला त्याबद्दल ‘विठोबा माऊली पावली’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली म्हणून कोणी विठोबा माऊलीवर राग धरेल काय? त्याच विठोबा माऊलीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व महाविकास आघाडीचे सरकार आले. संपूर्ण बंगाल दोनेक महिने ‘जय श्रीराम’च्या गर्जनांनी घुमत होता, पण ‘जय श्रीराम’नेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही.

आता ममतांचा विजय झाला म्हणून महाराष्ट्रातील भाजपवाले श्रीरामास पुन्हा वनवासात पाठवण्याची धमकी देणार का? लोकशाहीत हार-जीत व्हायचीच. पाच राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला, पण आसामात भाजपचे व बंगालात ममतांचे अभिनंदन राहुल व सोनिया गांधी यांनी केलेच आहे. विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! अशी खोचक टीकाही शिवसेनेनं केली आहे.  (Shivsena Saamana Editorial On Chandrakant Patil threat to chhagan bhujbal)

संबंधित बातम्या : 

‘बाळासाहेबांचे आशीर्वाद नसता तर महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते’, अरविंद सावंतांचा भाजपला टोला

‘टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा’, वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.