UPSCमध्ये मोठ्या घडामोडी… थेट चेअरमन सोनी यांचा राजीनामा; काय घडलं नेमकं?
पूजा खेडकरसह देशभरातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असतानाच यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अजून पाच वर्ष बाकी असताना सोनी यांनी राजीनामा दिल्याने यूपीएससीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोनी यांच्या राजीनाम्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

संघ लोक सेवा आयोग अर्थात यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोनी यांनी व्यक्तीगत कारणं दाखवून राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी जून अखेरीस राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला की नाही याची पुष्टी झालेली नाही. परंतु, सोनी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकप्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029मध्ये म्हणजे पाच वर्षानंतर संपणार होता. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. सोनी हे 2017मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून आले होते. 16 मे 2023 रोजी त्यांना यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाच्या अनुपम मिशन या संस्थेला सोनी हे अधिक वेळ देणार आहेत. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे.
वैयक्तिक कारणं दिली
2020मध्ये दीक्षा गेतल्यानंतर ते मिशनमध्ये एक साधू बनले होते. निष्काम कर्मयोगी म्हणून ते कार्यरत होते. दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाशी सोनी यांच्या राजीनाम्याचा काहीच संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. केवळ वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला आहे. सोनी हे तीनवेळा व्हाईस चान्सलर बनले होते. सर्वात कमी वयात कुलपती होण्याचा मान त्यांच्याकडे आहे. 2005मध्ये ते देशातील सर्वात कमी वयाचे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर बनले होते.
40व्या वर्षी व्हाईस चान्सलर
मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटचे असल्याचं सांगितलं जात आहे. मोदींनीच 2005मध्ये सोनी यांना वडोदरा एमएस विद्यापीठात कुलपती म्हणून नियुक्त केलं होतं असं सांगितलं जातं. ज्यावेळी सोनी यांची कुलपती म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते अवघे 40 वर्षाचे होते. संघ लोकसेवा आयोगात सामील होण्यापूर्वी सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठात तीन कार्यकाळांसाठी कुलपती म्हणून काम पाहिलं होतं.
नियुक्तीवरून वाद
दरम्यान, मनोज सोनी यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला होता. सोनी यांना यूपीएससीचे चेअरमन बनवणं हे संविधान विरोधी असल्याचं राहुल यांनी मह्टलं होतं. सोनी हे आरएसएसच्या जवळचे आहेत. त्यामुळेच त्यांना चेअरमन करण्यात आलं. सोनी यांना अध्यक्ष केल्याने यूनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन आता यूनियन प्रचारक संघ कमिशन बनेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.