
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या विविध मार्गानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली, याचा सर्वात जास्त थेट फटका हा भारताला बसला. त्यानंतर त्यांनी ग्रीन कार्ड लॉटरी योजना देखील सस्पेन्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे H-1B व्हिसा धारक असलेले हजारो भारतीय नागरिक आता भारतामध्येच अडकून पडणार आहेत, हे सर्व भारतीय आपलं वर्क परमिट रिन्यू करण्यासाठी भारतात आले होते. मात्र अमेरिकन दूतावासाकडून अचानक त्यांची अपॉइंटमेंट कॅन्सल करण्यात आल्यानं हे सर्व भारतीय नागरिक आता भारतातमध्येच अडकून पडले आहेत.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टनुसार 15 ते 26 डिसेंबरदरम्यान ज्या H-1B व्हिसा धारकांची अपॉइंटमेट होती, त्या सर्व अपॉइंटमेंट अमेरिकेनं रद्द केल्या आहेत. अमेरिकेमध्ये डिसेंबर महिना हा सुट्टीचा असतो, त्यामुळे या काळात अनेक H-1B व्हिसाधारकांचा आपला व्हिसा रिन्यूअल करण्याचा प्रयत्न असतो. मात्र आता ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणाचा या व्हिसाधारकांना मोठा फटका बसला आहे. अमेरिकन सरकारने या व्हिसाधारकांच्या अपॉइंटमेंट रद्द केल्या आहेत.
या संदर्भात या व्हिसाधारकांना अमेरिकन सरकारच्या वतीनं एक अधिकृत मेल देखील पाठवण्यात आला आहे, सरकारने सोशल मीडिया संदर्भांत नवं धोरण लागू केलं आहे, त्यामुळे तुमच्या अपॉईंटमेंटला वेळ लागणार असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. याचा मोठा फटका हा भारताला बसला आहे. कारण एच1बी व्हिसाधारक भारतीय नागरिकांची अमेरिकेत मोठी संख्या आहे. एच1बी व्हिसा धारक व्यक्तीला अमेरिकेत सहा वर्ष काम करण्याची परवानगी मिळते, मात्र आता ही व्हिसा पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी अमेरिकेतून होत आहे. याचा मोठा फटका भविष्यात अमेरिकेतील भारतीयांना बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जता आहे.