ना स्टेशन, ना पानाची टपरी! थेट ट्रेनच्या एसी कोचमध्ये थाटलं पानाचं दुकान! व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
ट्रेनमध्ये चहा-नाश्ता विकताना पाहिलं असेल, पण एसी कोचमध्ये पान बनवताना पाहिलंय का? सध्या ट्रेनच्या बर्थवर पान बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ट्रेनमध्ये प्रवास करताना चहा, कॉफी, समोसे, भेळ आणि पाणी विकणारे विक्रेते तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण ट्रेनच्या एसी कोचमध्येच पानाचं दुकान थाटलेलं पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती ट्रेनच्या लोअर बर्थवर कापड अंथरून पान बनवण्याचं साहित्य ठेवतो आणि एकामागून एक पान तयार करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ मुंबईहून छत्तीसगडकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बनवला गेला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या थर्ड एसी कोचमधील खालच्या बर्थवर बसून पान बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्रेनमधील स्वच्छता आणि अशा प्रकारे पान विकण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एसी कोचमध्येच पानाचं दुकान थाटलं!
हा व्हिडीओ एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @indiain24hr या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थेट थर्ड एसी कोचमधील खालच्या बर्थवर बसून पान बनवताना दिसत आहे. त्याने बर्थवर एक कापड अंथरले असून त्यावर पान बनवण्यासाठी लागणारे साहित्य ठेवले आहे. त्यानंतर तो पान तयार करताना दिसतो. हे दृश्य पाहून कोचमधील इतर प्रवाशांचेही लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
२० ते २५ पानांची ऑर्डर मिळाल्याचा दावा
व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीला सुमारे २० ते २५ पानांची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तो ट्रेनच्या बर्थवर बसून पानं तयार करत होता, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही माहिती व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या दाव्यावर आधारित आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर स्वच्छतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. ट्रेनमधील बर्थचा वापर प्रवाशांना बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी केला जातो. अशा ठिकाणी पान बनवण्याचे साहित्य ठेवून खाद्यपदार्थ तयार करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः एसी कोचमध्ये अनेक प्रवासी एकाच जागेचा वापर करत असल्याने स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, केवळ व्हिडीओच्या आधारे पान तयार करताना अस्वच्छता होती किंवा प्रवाशांना त्रास झाला असा निष्कर्ष काढता येत नाही.
रेल्वेच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, ट्रेनच्या आरक्षित एसी कोचमध्ये अशा प्रकारे पान तयार करून विकण्याची परवानगी होती का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तरी भारतीय रेल्वेकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत रेल्वेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
