Waqf Amendment Bill लोकसभेत सादर, आमची समिती डोकं चालवते, अमित शाह संसदेत काय बोलले?
Waqf Amendment Bill बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर झालं आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत हे विधेयक मांडलं. हे विधेयक मांडत असताना लोकसभेत गोंधळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या विधेयकावर बोलले आहेत.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना गोंधळ झाला. “वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीय. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीय. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे” असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मांडलं जात असताना काँग्रेसवर सडकून टीका केली.
“माननीय सदस्याने जो पॉइंट ऑफ ऑर्डर उचलला आहे, भारत सरकारच्या कॅबिनेटने या विषयी विधेयक मंजूर करुन सभागृहासमोर मांडलं. सभापती तुमच्याद्वारे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीला दिलं. विरोधी पक्षाचा हा आग्रह होता. समितीने यावर सुविचार करुन आपल मत प्रगट केलं. ते जे मत प्रगट केलं, ते पुन्हा कॅबिनेटसमोर आलं. कमिटीचे जे सल्ले होते, ते भारत सरकारच्य कॅबिनेटने स्वीकारले आणि सुधारणा म्हणून ते सल्ले किरेन रिज्जू यांनी मांडल्या. यात काही पॉइंट ऑफ ऑर्डर मला वाटत नाही” असं अमित शाह म्हणाले.
‘तर मग कमिटी कशाला हवी?’
“तुमचा आग्रह होता की, संयुक्त संसदीय समिती बनवा. आमची काँग्रेससारखी समिती नाही, आमची लोकशाहीप्रधान समिती आहे. आमची समिती डोकं चालवते, काँग्रेसच्या जमान्यात कमिटी शिक्का मारायच्या. आमची कमिटी चर्चा करते. चर्चेच्या आधारावर विचार आणि परिवर्तन करते. परिवर्तन स्वीकारायच नसेल, तर मग कमिटी कशाला हवी?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
संसदेत भाजपचा नंबर गेम काय?
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होण्यासाठी 272 मतांची गरज आहे. 542 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत भाजपचे 240 खासदार आहेत. 12 जे़डीयू, 16 टीडीपी, पाच एलजेपी, राष्ट्रीय लोकदलचे दोन आणि शिवसेनेचे सात आहेत. NDA च्या सर्व घटक पक्षांनी भाजपची साथ दिली, तर हे विधेयक सहज मंजूर होईल. राज्यसभेत NDA चे 125 खासदार आहेत. यात भाजपचे 98 सदस्य आहेत.
