Farmers Protest: कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यास तोडगा काढणं सोपं, सुप्रीम कोर्ट मोदी सरकारला झटका देण्याच्या तयारीत

न्यायालयाने शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीवरुन केंद्र सरकारला फटकारले. तुम्ही हा मुद्दा योग्यरित्या हाताळला नाही. त्यामुळे आम्हाला काहीतरी कृती करणे भाग आहे. | CJI on Farmers protest

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:03 PM, 11 Jan 2021
We are we suggesting staying the implementation of farm laws only to facilitate the talks before the Committee says CJI

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers protest) हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच न्यायालयाने शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीवरुन केंद्र सरकारला फटकारले. तुम्ही हा मुद्दा योग्यरित्या हाताळला नाही. त्यामुळे आम्हाला काहीतरी कृती करणे भाग आहे. तसेच कृषी कायद्यांना (Farm laws) तात्पुरती स्थगिती दिल्यास शेतकऱ्यांशी चर्चा करणे सोपे जाईल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटले. (Supreme Court CJI on Farmers protest and Farm laws)

आता सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालयाकडून शेतकरी आंदोलन कृषी कायद्यांना स्थगिती द्यायची की नाही, यासंदर्भात महत्त्वाचा निकाल सुनावला जाईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार

कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीतील सदस्यांची नावे सर्व पक्षकारांनी सुचवावीत. त्यावर महाधिवक्त्यांनी सहमती दर्शविली. मात्र, कृषी कायद्यांना स्थगिती देणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आम्ही कृषी कायदे संपवत नसल्याचे स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात येत असलेल्या समितीच्या प्रमुखपदी माजी न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांची वर्णी लागावी, असा शेतकरी संघटनांचा आग्रह आहे.

कृषी कायद्यांसंदर्भात उद्या महत्त्वाचा निकाल?

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार अशी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने आता कृषी कायद्यांसंदर्भातील निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी निकाल येण्याची शक्यता आहे.

मी जबाबदारी घेतो, शेतकऱ्यांना घरी परतायला सांगा- सरन्यायाधीश

या सुनावणीवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिल्लीच्या वेशीवर 47 दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना माघारी परतण्याची विनंती घेतली. मी हा धोका पत्करतो. शेतकऱ्यांना सांगा की, सरन्यायाधीश तुम्हाला घरी परतायला सांगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

‘सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही’, शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवण्याचं षडयंत्र, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

(Supreme Court CJI on Farmers protest and Farm laws)