मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघतात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ
| Updated on: Jul 17, 2026 | 12:08 PM

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुर्शिदाबादमध्ये भरधाव ट्रेनने शाळेची व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेत व्हॅनचा चक्काचूर झाला. तर या अपघतात 2 विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुर्घटना मुर्शिदाबादच्या बहरमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कर्णसुबर्ण आणि गोंबिदपूर रेल्वे स्टेशनच्या क्रॉसिंगवर ही घटना घडली. ट्रेनने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेच्या व्हॅनचा हा अपघात झाला. ही व्हॅन सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. रेल्वे क्रॉसिंगचा फाटक खुला असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हॅनचा चालक रेल्वे ट्रॅक ओलांडत होता, त्याचवेळी निमतिता-काटोया पॅसेंजर ट्रेनची एन्ट्री झाली. त्यानंतर ट्रेन आणि स्कूल व्हॅनची एकमेकांना जोरदार धडक दिली. ट्रेनच्या धडकेत व्हॅन उलटून दुसरीकडे कोसळली. या अपघातावेळी व्हॅनमध्ये चालकासहित 8 जण होते. व्हॅनमधील सर्व जण बाहेर पडले.

नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगचा एक बाजूचं फाटक बंद होते. परंतु दुसऱ्या बाजूला असलेलं फाटक बंद करण्यात आलेलं नव्हतं. फाटक खुले असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे क्रॉसिंगवर तैनात असलेल्या गेटमॅनने फाटक बंद केलं नाही. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर आजूबाजूला उपस्थित लोक मदतीला धावले. त्यांनी तातडीने जखमींना कर्णसुबर्ण ब्लॉक रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्याआधी दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

स्कूल व्हॅनमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार देऊन मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात हलविण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघातप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातात 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूने शाळेवर शोककळा पसरली आहे. तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us