
Boris Johnson India visit updates : देशात सध्या भोंग्यावरून बाद सुरू असतानाच बुलडोझर वाद ही चांगलाच रंगलेला आहे. काल याच बुलडोझरची कारवाई जहाँगिरपुरी परिसरात झाली आणि अनेक अतिक्रमणे भूईसपाट करण्यात आली. यानंतर देशात बुलडोझर (Bulldozer) राजकारण चांगलच तापलेलं आहे. याच गरमागरमीत बोरिस जॉन्सन (Boris Johnson) हे ब्रिटनचे पंतप्रधान (Prime Minister of the UK) म्हणून भारत दौऱ्यावर येत आहेत. ते आपल्या दौऱ्याची सुरूवात गुजरातमधून करणार आहेत. तर विशेषबाब म्हणजे येथील हलोल, वडोदरा येथे बुलडोझर प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. हे युनिट जेसीबीचे आहे. दरम्यान याच्याआधी जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो क्लायमेट समिट दरम्यान भेट झाली होती. त्यानंतर जॉन्सन यांचा भारत दौरा गेल्या वर्षी दोनदा रद्द झाला होता. मात्र याभेटीत दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक प्रश्न मार्गी लागतील असे बोलले जात आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांच्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होईल. ज्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भारताशी चर्चा करतील. यासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातही दोन्ही देशांच्या नवीन भागीदारीची घोषणा केली जाऊ शकते.
पहिल्याच दिवशी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे अहमदाबादमध्ये गुंतवणूकदारांच्या होणाऱ्या समिटमध्ये भाग घेणार आहेत. त्यात वाणिज्य, व्यवसाय आणि भारत आणि यूकेमधील संबंधावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे येथील लोकांमधील कनेक्टिव्हिटीने होईल.
त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धातील द्विपक्षीय संबंधांपासून आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंतही जॉन्सन यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या दौऱ्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जॉन्सन हे रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर कोणत्याही प्रकारचे प्रवचन देण्यासाठी येत नाहीत. म्हणजेच रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर भारताची प्रतिक्रिया कशी असावी यासाठी तो कोणताही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही. ज्याप्रमाणे अमेरिकेने प्रयत्न केले.
बोरिस जॉन्सन यांच्या दौऱ्यामुळे मुक्त व्यापार कराराच्या प्रस्तावाला गती मिळणे, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवणे आणि संरक्षण संबंधांना गती मिळणे अपेक्षित आहे. बोरिस जॉन्सन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची चर्चा ही मुख्यत इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थितीवर होण्याची शक्यता आहे.
भारताला भेट देण्यापूर्वी जॉन्सन म्हणाले, जगातील शांतता आणि समृद्धी हुकूमशाही सरकारांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे जगातील लोकशाही आणि मैत्रीपूर्ण देश एकमेकांसोबत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जगातील शांतता आणि समृद्धीवर चर्चा होईल.
या अंतर्गत, दोन्ही देश लष्करी हार्डवेअरच्या संयुक्त उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास तयार आहेत. जॉन्सनच्या भेटीमुळे भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या पुढील फेरीचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार चर्चा पुढील आठवड्यात होणार आहे.
याआधीही दोन्ही नेत्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. पण मे २०२१ मध्ये ही भेट आभासी होती. या बैठकीत आरोग्य, हवामान, व्यवसाय, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर ब्रिटिश-भारतीय संबंधांवर चर्चा झाली. आणि दोघांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वाढविण्यावर चर्चा केली.
भारताने यूकेमध्ये 5,300 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यास सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे, 2023 मध्ये जी-20 बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ब्रिटनला या बैठकीत महत्त्वाची भूमिका घेऊन सहभागी व्हायचे आहे. यावरही चर्चा होणार आहे.
जॉन्सन यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान सायबर सुरक्षेचे मोठे जाळे विकसित केले जाणार आहे. दोन्ही देश संयुक्त सायबर सुरक्षा कार्यक्रम सुरू करणार आहेत. या अंतर्गत भारत आणि ब्रिटन संयुक्तपणे सायबर गुन्हेगार आणि रॅन्समवेअर हल्ल्यांना सामोरे जातील. याशिवाय पहिला स्ट्रॅटेजिक टेक डायलॉगही सुरू होईल. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा नंतर भारत हा पाचवा देश आहे. ज्यांच्यासोबत ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक करार करणार आहे.
त्यांच्या भारत भेटीपूर्वी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी ट्विट केले की भारत एक आर्थिक महासत्ता आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत हा यूकेचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. ते म्हणाले की, माझ्या दौऱ्यामुळे रोजगाराच्या संधी, सुरक्षा आणि आर्थिक विकासाचे संबंध वाढतील.