भारतात गंगेपेक्षा जास्त दंगे होतात, हेच आपले दुर्दैव; पंडित धीरेंद्र शास्त्रींनी मांडले परखड मत
टीव्ही९ च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कार्यक्रमात बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी भारताच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते भारताच्या सौंदर्याच्या क्षरणाबद्दल, वाढत्या दंगली, अत्याचार, बेरोजगारी आणि विदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाबद्दल बोलले. त्यांनी यासाठी प्रत्येकाची जबाबदारी अधोरेखित केली आणि देशाच्या एकात्मतेसाठी जागरूकतेची गरज अधोरेखित केली.

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या महामंचाच्या तिसऱ्या पर्वाच्या आज दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त आज बागेश्वर धामचे बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हजेरी लावली. यावेळी पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर आपले परखड मत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी त्यांना तुम्ही आजच्या समाजाकडे कसे पाहता, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी “भारत जसा असायला हवा तसा नाही. भारताचे जे सौंदर्य आहे, ते आज दिसत नाही. भारताची खरी ओळख ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेत आहे.” असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले..
यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या समाजाबद्दल भाष्य केले. आपल्या समाजात निश्चितपणे बदल होत आहेत. भारताची परिस्थिती बदलत आहे. विदेशातील काही शक्तींनी भारतातील काही लोकांचे ब्रेन वॉश केले आहे. ते कोणत्याही धर्म किंवा पंथाचे असू शकतात. याच कारणामुळे आज भारतात सद्यस्थितीत गंगापेक्षा जास्त दंगा होत आहे, जे या देशाचे दुर्भाग्य आहे. कमी होणारे संस्कार आणि वाढणारे अत्याचार, लाचार परिस्थिती आणि बेरोजगार युवा असा सध्याचा समाज आपण पाहत आहोत, असे पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
मग या समाजासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. “यासाठी तुम्ही आणि आम्ही जबाबदार आहोत. आपण यासाठी कोणत्याही सरकारवर बोट दाखवू शकत नाही. कारण या देशात राहणारी प्रत्येक व्यक्तीपासूनच सरकार तयार होते. आज या देशातील कोणत्याही नागरिकाला त्याचे अधिकार माहिती नाही. तो झोपलेला आहे. त्यामुळेच देशाची ही दुर्दशा झाली आहे. म्हणूनच अशा समाजासाठी केवळ आपणच जबाबदार आहोत.” असे पंडित धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले
धीरेंद्र शास्त्री यांनी विदेशी शक्तींच्या भूमिकेबद्दलही भाष्य केले. “पूर्वी आपल्यात विदेशी शक्तींचा हस्तक्षेप नव्हता, जितका आता तो वाढला आहे. पूर्वी भारताला केवळ जादूगारांचा देश म्हणून ओळखले जायचे आणि आता पुन्हा एकदा भारताला लुटण्याची तयारी सुरू आहे, देशाला मिटवण्याची तयारी सुरु आहे. भारताला पुन्हा एकदा तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे मला असे वाटते की पूर्वीपेक्षा आता विदेशी शक्ती जास्त मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत” अशा शब्दात धीरेंद्र शास्त्रींनी बदलत्या समाजाबद्दल आपली चिंता आणि विचार व्यक्त केले.
