WITT Satta Sammelan | भाजपमध्ये कुणाचंही स्वागत, फक्त अट एकच…; अमित शाह यांनी कोणती अट सांगितली?
भारतातील सर्वात चांगले वकील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लढलं पाहिजे. एजन्सीच्या कारवाईबाबत काँग्रेसने तरी बोलू नये. इंदिरा गांधी यांनी कारणाशिवाय लोकांना आतमध्ये टाकलं होतं. वर्तमानपत्रांवरही बंदी घातली होती, असं सांगत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : गेल्या तीन दिवसापासून दिल्लीत टीव्ही9 नेटवर्कचा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे हा कार्यक्रम सुरू आहे. आज कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संवाद साधला. अमित शाह यांनी या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. काश्मीरपासून ते आयपीसीतील बदलापर्यंत, काँग्रेसपासून ते इंडिया आघाडीपर्यंत आणि ईडीच्या कारवाईपासून भाजपमध्ये येणाऱ्यांपर्यंत… सर्वच विषयावर अमित शाह यांनी रोखठोक मते मांडली.
भाजपमध्ये अनेक लोक येत आहेत. प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्यावर ईडीचे आरोप झाले त्यांनाही पक्षात प्रवेश दिला जात आहे, असा सवाल अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावर मला तुमचीही गरज आहे. तुम्हीही भाजप ज्वॉईन करा. आमचा पक्ष घराणेशाही मानत नाही. पक्षातील कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची सोय लावणं यावर आमचा विश्वास नाही. भाजपमध्ये कुणीही येऊ शकतं. अट फक्त एकच आहे. ती म्हणजे भाजपच्या अजेंड्याशी सहमत असलं पाहिजे. भाजपच्या अजेंड्याशी सहमत असलेल्या सर्वांचं भाजपमध्ये स्वागत आहे, हीच आमची प्रमुख अट आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.
कुणाचीही केसमागे नाही
ईडी किंवा इतर संस्थांच्या चौकश्या सुरू असलेले भाजपमध्ये कोणी आले असले तरी कुणाचीही केस भाजपने मागे घेतलेली नाही. काँग्रेसने दहा वर्षात भ्रष्टाचार केला होता. या भ्रष्टाचाराची त्यांच्याच सरकारने सीबीआय चौकशी लावली होती. कशासाठी चौकशी लावली होती? कॉमनवेल्थवर कुणी चौकशी केली?तर काँग्रेसने केली. काँग्रेसने त्यांच्या सरकारात त्यांच्याच विरोधात 40 केसेसमध्ये चौकश्या लावल्या होत्या. तेव्हा कुणाचं सरकार होतं? ईडीने जे लाखो रुपये जप्त केलं आहे, तो सर्व काळ्या पैशाविरोधातील मोहिमेचा भाग आहे. ईडीने जप्त केलेला 95 टक्के काळा पैसा इतरांचा आहे. फक्त 5 टक्के पैसा राजकारण्यांचा आहे, असा दावाही अमित शाह यांनी केला.
भ्रम फैलावला जात आहे
आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून करोडो रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल? तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का? ईडीने जेवढ्या कारवाया केल्या,त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर 95 टक्के इतर लोक आहेत. पण आमच्या विरोधात अफवा पसरविल्या जात आहेत. भ्रम फैलावण्याचं काम सुरू आहे.
