BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!

जगाच्या पातळीवर डॉ.आंबेडकर हे असे नाव आहे जे सर्वांना परिचित आहे आणि ज्या नावाने प्रत्येकावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या प्रभाव केला आहे. परंतू आता हे फक्त नाव नसून तो एक विचार, एक चळवळ आहे. म्हणूनच आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 1:18 PM

जगाच्या पातळीवर डॉ.आंबेडकर हे असे नाव आहे जे सर्वांना परिचित आहे आणि ज्या नावाने प्रत्येकावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या प्रभाव केला आहे. परंतू आता हे फक्त नाव नसून तो एक विचार, एक चळवळ आहे , ज्याने वर्षानुवर्षे जातीय व्यवस्थेला बळी पडलेल्या भारतातील लाखों शोषित, पीडित, मागासवर्गाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला. आता ही चळवळ पुढे नेत असतांना बहुसंख्य लोकांचा प्रामाणिक उद्देश हा सामाजिक परिवर्तनाचा आहे , तर काहींसाठी हा फक्त मतपेटी भरण्यासाठी मर्यादित आहे (Dr Babasaheb Ambedkar and his excellence).

डॉ. आंबेडकरांचे कार्य हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे आहे. परंतू त्यांना विशिष्ट जातीपूर्तीच मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. त्यांना दलित, शोषितांचे कैवारी म्हणत असतांना , ते फक्त तेवढ्यापूरतीच मर्यादित नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे योगदान हे भारतातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाज घटकांसाठी राहिलेलं आहे. परंतू त्यांच्या कार्यामागे एकच महत्वाचा उद्देश राहिलेला आहे . तो म्हणजे देशातील जाती व्यवस्था संपुष्टात आणणे . कारण जाती व्यवस्थाच या देशातील सर्व समस्यांची जननी आहे. आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारीता:

समाजातील प्रत्येक घटकांना माध्यमात प्रतिनिधित्व मिळायला हवं , अन्यथा एकतर्फी आणि असंतुलित माहितीचाच प्रसार होत राहील. पण ज्या समाजाला वर्षानुवर्षे प्रतिनिधित्वा पासून वंचित ठेवण्यात आले , त्या समाजाने स्वतःचेच माध्यम तयार करावे , ज्यामुळे त्या समाजाच्या समस्या व दुःख सर्वांसमोर मांडता येईल , असे डॉ.आंबेडकरांचे मत होते. म्हणून मूक्या समाजाच्या व्यथा व विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ.आंबेडकर स्वतः १९२० साली पत्रकारितेकडे वळले.

३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. मूकनायक म्हणजे ‘मुक्या समाजाचा नायक’. वर्षानुवर्षे ज्या समाजावर अन्याय होत राहिलेला आहे , त्या समाजाला त्याविरुद्ध लढा देऊन न्याय मिळवुन देण्यासाठी उपाययोजना सांगणारे एक माध्यम “मूकनायक”. या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी लढा निर्माण केले. कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या पाक्षिकाला २५०० रुपयांची मदत केली होती. तीन वर्षे हे पाक्षिक चालले त्यानंतर बाबासाहेब विदेशात गेल्यानंतर ते बंद पडले.

विदेशातून परत आल्यानंतर ३ एप्रिल १९२७ साली डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकेला सुरुवात केली. तो काळ महाड सत्याग्रहाच्या आंदोलनाचा होता. या पक्षिकेत बाबासाहेबांनी अनेक महत्वाचे विषय मांडले होते. १९२७ सालीचा सर्वात मोठा चर्चेतला विषय म्हणजे एका हिंदू स्त्रीचा मुसलमान पुरुषासोबतच्या लग्नाचा. त्यावेळेस मराठी वृत्तपत्र जे प्रामुख्याने पुण्यावरून प्रकाशित होत होते , त्यांनी त्यावर टीका केली. परंतू बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकेत संपादकीय लेख लिहून त्या लग्नाचे स्वागत केले आणि आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह करण्याचे आवाहन केले होते. यातुन लक्षात येते की , सामाजिक बदल करण्याचे माध्यम म्हणून बाबासाहेब वृत्तपत्राकडे कसे बघतात .

बालविवाह , वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश सत्याग्रह ,सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद,मजूर पक्ष, सायमन कमिशन इत्यादी विषयांवर बाबासाहेबांनी लेखन केले.

१९३० साली त्यांनी ‘जनता’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. पहिल्या दोन वृत्तपत्रात म्हणजेच मूकनायक आणि बहिष्कृत भारत यात ते प्रत्यक्ष दखल घेऊन लिखाण करायचे . परंतू १९३० नंतर त्यांनी वृत्तपत्राची बरीच जबाबदारी ही त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांकडे सोपवली. त्यात देवराव नाईक,बी. आर कडरेकर, जी.एन सहस्त्रबुद्धे, आर.डी भंडारे आणि बी.सी कांबळे यांचा समावेश होता.

१९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी ‘जनता’चे नाव बदलवून ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. वृत्तपत्रांतून छापत असलेल्या जाहिरातीं विषयी आंबेडकरांचे वेगळे मत होते. जाहिरातींशिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही , हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या आहारी जावे का? आणि कितपत जावे “आर्थिक सवलतीसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात या संबंधीची संहिता पाडायला हवी, असे ते म्हणत. जाहिरातीची उद्दीष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोधाभास निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्व भ्रष्ट होते, असा त्यांचा दावा असे.

जाहिरात आणि नीतिमत्ता यांचा अनन्यसाधारण संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्रांकडे पाहिले. समाजातील दुःख, अन्याय जगासमोर मांडून त्याच्यावर उपाय सांगण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला. डॉ.बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार ,भूमिका आजही तंतोतंत लागू पडते . या वरूनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.

सत्याग्रही आंबेडकर:

भारतातील जाती व्यवस्थेच्या निर्मितीचा इतिहास डॉ.आंबेडकरांनी Caste in India: Their Mechanism, Genesis and Development,या कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागात सादर केलेल्या संदर्भात उत्तमरित्या मांडला . ज्याला आज पर्यंत कुणी आव्हान देऊ शकले नाही, त्या वर्ण,जातीच्या आधारावर टिकून असलेल्या व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता आणि तो अधिकार २१ व्या शतकात सुद्धा हिरावला जात आहे. या अश्या जात व्यवस्थेच्या रूढी, परंपरेला संपुष्टात आणण्याचं काम डॉ. आंबेडकरांनी केलेलं आहे आणि या विरोधात लढा देण्याच्या कामाला डॉ. आंबेडकरांनी या माध्यमातून सुरुवात केली होती.

हजारो वर्षांपासून चालत आलेली जाती व्यवस्था मनुने मनुस्मृती या ग्रंथात नियमावलीच्या रुपात तयार केली , ज्यात वर्णाधारीत नियम होते. विषमता प्रस्थापित करणारा तो ग्रंथ होता. ज्याने स्त्रीचा सन्मान केला नाही. अश्या मनुस्मृतीला डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन करून , या व्यववस्थेला मोठे आव्हान देण्याचे काम केले.

त्यापूर्वी २० मार्च १९२७ ला जगाच्या पातळीवर पाण्यासाठी पाहिला सत्याग्रह केला होता. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला, त्यानुसार सार्वजनिक खर्चाने बांधलेल्या आणि देखरेख होत असलेल्या किंवा सरकारने नेमलेल्या मंडळांकडून निर्माण केलेल्या सर्व सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, धर्मशाळा, सार्वजनिक शाळा, न्यायालये, कचेऱ्या व दवाखाने यांवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना परवानगी असावी असे म्हटले गेले. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला . परंतू त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून दि. १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या अस्पृश्य समाजाला गावातील सामूहिक पाण्याच्या स्रोतातून पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो पाण्याच्या स्रोत डॉ. आंबेडकरांनी सर्वांसाठी खुला केला. परंतू तो सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नसून मानवाधिकारासाठीचा सत्याग्रह होता , हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. पाण्याचे स्रोत खुले करून अस्पृश्यता निवारण होणार नाही, हे त्यांना माहीत होते . परंतू बाबासाहेबांचा हा प्रयत्न होता की , या माध्यमातून अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी संघटितपणे लढण्याची प्रेरणा मिळेल.

महत्वाचे म्हणजे महाड सत्याग्रहाच्या आधी बाबासाहेब रायगडावर जाऊन शिवरायांना मानवंदना दिली होती आणि सत्याग्रहाच्या वेळेस ‘जय शिवरायाच्या’ घोषणा सुद्धा दिल्या होत्या. त्यानंतर २ मार्च १९३० साली बाबासाहेबांनी प्रसिद्ध काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. २९ डिसेंबर १९२९ रोजी विहितगावच्या चावडीत झालेल्या बैठकीत मंदिर प्रवेशाची घोषणा केली आणि सत्याग्रहाची तारीख निश्चित करण्यात आली. या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी आर.जी गार्डन यांना देण्यात आली . त्यानंतर त्यांनी महाविभागाचे आयुक्त यांना कळविले. सत्याग्रहात सुमारे आठ हजार लोक एकत्र झाले होते. त्यांनी मंदिराच्या चारही दरवाज्यांवर ठिय्या दिला होते. सत्याग्रहाच्या दरम्यान सनातन्यांकडून दगड फेक करण्यात आली होती त्यात बाबासाहेबांसह अनेक सत्याग्रही जखमी झाले होते. परंतू एकही सत्याग्रही मागे हटला नाही. शेवटी सरकारला सत्याग्रहापुढे झुकावेच लागले.

डॉ.आंबेडकर म्हणतात की, काळाराम मंदिराचे सत्याग्रह करून आम्हाला राम भक्त बनायचे नाही, तर या भारत देशात असणाऱ्या दगडी जातीव्यवस्थेला सांगायचे आहे की , आम्ही पण सजीव प्राणी आहोत. तुमच्या या मंदिरात कुत्रे, मांजरे, शेळ्या, मेंढ्या प्रवेश करू शकतात तर आम्ही का नाही…?? यातून हेच दिसून येते की , ही लढाई देवळात जाऊन देवाला पूजण्याची नाही तर अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई होती.

डॉ.आंबेडकरांनी अनेक मंदिरांच्या प्रवेशासाठी सत्याग्रह केला . त्यात, अंबादेवी मंदिराचा सुद्धा समावेश होता. अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळावा, यासाठी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १३ नोव्हेंबर १९२७ रोजी परिषदेसाठी बोलावण्यात आले होते. तारीख निश्चित करून यशस्वीरित्या तो सत्याग्रह पार पडला. पुण्यातील सुद्धा काही मंदिरांच्या प्रवेशासाठी डॉ.आंबेडकरांनी सत्याग्रह केला . त्यात पर्वती टेकडीवरील मंदिराचा सुद्धा समावेश होता. महाराष्ट्रातील अनेक मंदिर अस्पृशांसाठी सुरू करून त्यांच्या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईत डॉ. आंबेडकर यशस्वी झाले.

स्त्रीमुक्तीचे पुरस्कर्ते डॉ.आंबेडकर:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीदास्याची समस्या मांडतांना ज्योतिबा फुलेंची भूमिका स्वीकारली होती. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेची समस्या समजून घेण्यासाठी मनुस्मृती सकट सर्व धर्मग्रंथांची चिकित्सा केली व रामायण, महाभारत आणि सर्व हिंदू पुरणाचा मानवीयतेच्या दृष्टीने अभ्यास केला . यातून ते एकच निष्कर्ष काढतात की , वर्णव्यवस्था ,जातीवाद आणि अस्पृश्यतेचे मूळ हे याच धर्मग्रंथात दडलेलं आहे. सोबतच स्त्री गुलामगिरीच्या प्रथा (सतीप्रथा,बालविवाह,विधवा पुनर्विवाहास बंदी) या कश्या जातिव्यवस्थेशी जुडलेल्या आहेत, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. माणसा- माणसात आणि स्त्री – पुरुषांमध्ये  विषमता प्रस्थापित करण्याचं काम व विषमतावादी ,कर्मकांडी विचारांचा प्रसार हे मनुस्मृती सारखे धार्मिक ग्रंथ करीत आहेत . म्हणून २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती जाळून स्त्री मुक्तीच्या लढ्याला सुरुवात केली.

ज्या मनुस्मृतीने  स्त्रियांचे सर्व प्रकारचे  हक्क नाकारले होते,जी पुरुषप्रधान व्यवस्थेची गुलाम झाली होती, जीला कौटुंबिक,सामाजिक सन्मान नव्हता आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक अधिकार नव्हता . तिला या सगळ्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी  बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री असतांना २१ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांना न्यायिक हक्क,दर्जा व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘हिंदू कोड बिल’ मांडले. पण भारतातील सनातनी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेने बाबासाहेबांचा विरोध केला व ते बिल मंजूर झाले नाही आणि फक्त स्त्री मुक्तीच्या लढ्याच्या अपयशाने दुखी होऊन त्यांनी भारतातील तमाम स्त्रियांच्या हक्कांसाठी २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

प्रारंभी या बिलाचे ७ भाग होते १. स्त्रियांना मालमतेचा वडिलोपार्जित अधिकार २.मृताचा वारसदार ठरविण्याचा अधिकार ३. पोटगी  ४. विवाह ५. घटस्फोट ६. दत्तकविधान ७. अज्ञानत्व व पालकत्व जे  मंजूर काण्यात आले नाहीत. पुढे १९५५  रोजी हिंदू कोड बिल  वेगळ्या स्वरूपात मंजूर झाले . त्यात १. हिंदु वारसाहक्क कायदा २. हिंदू विवाह कायदा ३. हिंदू अज्ञांचे पालकत्व कायदा ४. हिंदू दत्तक व पोटगी कायदा यांचा समावेश होता.अंतशः का होईना पण बाबासाहेबांचे  स्वप्न पूर्ण झाले आणि आज स्त्री एक ” व्यक्ती ” म्हणून स्वाभिमानाने जगण्यास पुढे येऊ लागली. बाबासाहेबांचे हे कार्य फक्त स्त्रीमुक्तीच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे.

शेतकरीस्नेही डॉ. आंबेडकर:

भारतातील शेतकरी व शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी डॉ. आंबेडकरांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. डॉ.आंबेडकरांनी कोकणातील शेतकऱ्यांचे खोतांच्या दास्यातून मुक्तता व्हावी , म्हणून फार मोठी चळवळ उभारली. १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधी मंडळात मांडले होते. १० जानेवारी १९३८ रोजी २३ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधी मंडळावर नेण्यात आला होता . त्यात कोकण, सातारा, नाशिक व विविध भागातील शेतकरी सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडन्यासाठी अनेक सभांमध्ये मार्गदर्शन करून सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली.

१४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी येतील चिपळूण येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबांनी भूषवले. महार वतनदारी निर्मूलनासंदर्भात परंपरागत सेवा कायद्या नुसार निम्नस्तरीय शासकीय कर्मचारी २४ तास राबविल्या जात होते , त्यांना हा निर्घृण अन्याय सहन करण्याचा मोबदला लहानसा पिकाऊ नसलेला जमिनीच्या तुकड्याच्या रूपात दिला जाणार होता. या संदर्भात गरीब ग्रामीण व जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला व त्यांना जागरूक केले.

आंबेडकरांनी शेती विषयक आखलेल्या योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे, दामोदर प्रकल्प. त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, वीजनिर्मितीसाठी व पाण्यातील दळणवळणासाठी करावा , असे त्यांना वाटले. त्यांनी दामोदर नदी प्राधिकरण स्थापन करून सोन नदी, महानदी, कोसी, चंबळ आणि दक्खनमधील नद्यांचे काम हाती घेतले.

सामूहिक शेतीवर त्यांचा भर होता. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि ती सुद्धा सामूहिक असावी असे त्यांचे मत होते. भारताचा शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी भारतीय लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक इतर धंद्याकडे वळावे , असे त्यांना वाटत होते. शासनातर्फे निगराणी ,कर्जरोखे,पैश्यांची परतफेड या सोबतच शेती व महत्वाचे उद्योग राष्ट्राच्या मालकीचे व्हावेत ,असे त्यांचे मत होते.

बाबासाहेबांनी शेती विषयक केलेल्या कामांपैकी महत्वाचे काम म्हणजे राष्ट्रीय सिंचन धोरण. हे धोरण त्यांनी सरकारला सुचविले होते. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि पाण्यामुळेच देश जगू शकतो हे त्यांनी सांगितले होते. बाबासाहेबांच्या विचारानुसारच सरकारने दामोदर प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प व इत्यादी अनेक प्रकल्प हाती घेतले होते. व्यक्ती ते राष्ट्र असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशावर आधारित योजना त्यांनी आखल्या होत्या. शेती व शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये , म्हणून शेतकरी व मजुरांनी संगठीत होणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांनी वेळो वेळी सांगितले होते.

दूरदृष्टी ठेऊन काम करणाऱ्या आंबेडकरांनी देशातील प्रत्येक भारतीयांच्या कल्याणासाठी कार्य केलेले आहे . सोबतच समता, बंधुता आणि न्यायावर एकसंघ राष्ट्र निर्माणसाठी त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून खूप मोठे योगदान दिले आहे.

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Dr Babasaheb Ambedkar and his excellence

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.