जे संभाजी छत्रपतींच्या पोटात तेच ओठावर आलंय का? मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा समजून घ्या 10 पॉईंट्समधून

मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा, इच्छा असण्यात काही गैर नाही. कोणत्याही नेत्याला त्यासाठी प्रयत्न करावासा वाटणं स्वाभाविक आहे. याच नेत्यांमध्ये सध्या समावेश झालाय तो संभाजी छत्रपती यांचा. त्यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं आहे. पण बीडच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी मला आधी मुख्यमंत्री करा अन् पुन्हा प्रश्न विचारा असं व्यासपीठावरुन जाहीर वक्तव्य केलं,

जे संभाजी छत्रपतींच्या पोटात तेच ओठावर आलंय का? मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा समजून घ्या 10 पॉईंट्समधून
खासदार संभाजीराजे छत्रपती
माणिक मुंढे

| Edited By: सचिन पाटील

Jul 03, 2021 | 11:57 AM

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा, आकांक्षा अनेक नेत्यांना असते. ती काही जण जगजाहीर करतात तर काही जण मनात ठेवतात. योग्य वेळी ती उघडी करतात. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा, इच्छा असण्यात काही गैर नाही. कोणत्याही नेत्याला त्यासाठी प्रयत्न करावासा वाटणं स्वाभाविक आहे. याच नेत्यांमध्ये सध्या समावेश झालाय तो संभाजी छत्रपती यांचा. त्यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं आहे. पण बीडच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी मला आधी मुख्यमंत्री करा अन् पुन्हा प्रश्न विचारा असं व्यासपीठावरुन जाहीर वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या जे मनात आहे तेच ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण त्यांची ही महत्वकांक्षा किती वास्तववादी आहे हेही 10 मुद्यांच्या आधारावर तपासून पाहूया. (Sambhajiraje Chhatrapatis statement about Chief Minister post what is the facts and figures all you need to know about Maharashtra politics in 10 points)

1. नेमकं काय म्हणाले संभाजी छत्रपती?

मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपती सध्या राज्याचा दौरा करत आहेत. काल ते बीडच्या दौऱ्यावर असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातच प्रश्नांचा भडीमार केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तुम्ही मागच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा प्रश्न विचारायचा, तुम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा प्रश्न विचारायचाय, ती कुणी उत्तर देऊ शकत नाहीत आणि देणार नाहीत. मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ना? तर मला आधी मुख्यमंत्री करा आणि अन् मगच विचारा.

2. फक्त मराठा समाजाचं नेतृत्व?

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजी छत्रपती सध्या सक्रिय आहेत. एक गोष्ट मानावीच लागेल की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात सर्वाधिक वेगानं पुढं आलेले आणि समाजाचा पाठिंबा असलेले ते एकमेव नेते आहेत. इतरही संघटना, नेते मराठा समाजाच्या आहेत पण मराठा समाजाचा म्हणून जो पाठिंबा संभाजी छत्रपतींना आहे तो क्वचितच इतर कुठल्या नेत्याला पहायला मिळतोय. मराठा हा मराराष्ट्रातला बहुसंख्यांक समाज असला तरीसुद्धा फक्त त्या एका समाजाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणं कितीपत वास्तववादी आहे?

3. ओबीसी नेत्यांचा पाठिंबा मिळणार?

राज्यात जिथे कुठं सध्या संभाजी छत्रपती दौऱ्यावर जातात, तिथं त्यांच्या स्वागतासाठी फक्त मराठाच नाही तर इतर समाजातले नेतेही हजर असतात. त्यात ओबीसी नेते, मंत्री यांचाही भरणा आहे. पण याचा अर्थ असा नाही की ओबीसी नेत्यांचा पाठिंबा संभाजी छत्रपतींना मिळू शकतो. आता त्यांच्याकडे मराठा समाजासाठी झटणारे नेते म्हणून पाहिलं जातंय. त्यात ओबीसी नेत्यांनाही काही स्वत:ची राजकीय गणितं दिसतात, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात ओबीसी नेते हजर रहातात. पण जशीही राजकीय महत्वकांक्षा आता जाहीर केलीय तर कदाचित इथून पुढे संभाजी छत्रपतींच्या व्यासपीठावर जाताना भाजपसहीत इतर नेतेही विचार करतील.

4. मराठा विरुद्ध ओबीसी वाद?

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून मराठा विरुद्ध ओबीसी हा जातीय वाद चालूच आहे. भलेही तो वर वर शांत वाटत असला तरीसुद्धा सत्तेची समिकरणं आतून बदलण्याची त्यात ताकद आहे. ती बदलेली दिसतायत. ह्या वादात सध्या तरी संभाजी छत्रपती हे मराठा समाजाची बाजू मांडतायत. रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी चिंता व्यक्त केली. पण बहुतांश मराठा
संघटनेचे नेते मराठ्यांना आता ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करतायत. त्याचा फटका संभाजी छत्रपतींना बसू शकतो.

5. पवारांचं सर्वोच्च, सर्वमान्य नेतृत्व

शरद पवार हे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचे नेते आहेत. मतांच्या राजकारणात त्यांची 50 वर्षापेक्षा जास्त काळ कारकिर्द आहे. ते फक्त मराठाच नाही तर अठरापगड समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या संस्था, नेते, कार्यकर्ते, अशा वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाशी त्यांची अजूनही नाळ जोडली गेलेली आहे. बरं मराठा समाजाचाही त्यांना कायम पाठिंबा मिळत आलाय.
त्यापार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांचं नेतृत्व कसं उभं राहणार?

6. एक समाज, अनेक पक्षात

मराठा हे महाराष्ट्रात बहुसंख्यांक आहेत. पण याच समाजाचे नेते हे सर्वपक्षात आहेत. काँग्रेसच्या चव्हाण, थोरातांपासून ते भाजपच्या चंद्रकांत पाटील, नारायण राणेंपासून ते राष्ट्रवादीतल्या अजित पवार, जयंत पाटलांपर्यंत अशा मोठ्या नेत्यांची फळी ऑलरेडी कार्यरत आहे. मतांच्या गणितात, वेगवेगळ्या माध्यमातून हा समाज अशा नेत्यांशी जोडला गेलाय. तो फक्त एका मुद्यावर संभाजी छत्रपती यांच्या पाठिशी कसा
उभा राहणार?

7. जातीनिरपेक्ष मुख्यमंत्री

मंत्री, नेते हे जातीचं राजकारण करतात पण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या राजकारणावर एक नजर टाकली तर लक्षात येईल की, एकाच समाजाचं राजकारण करणारा नेता फार फार तर कॅबिनेट मंत्री झालेला आहे पण तो मुख्यमंत्री नाही झालेला. उलट ज्यांच्या समाजाचं प्रमाण कमी असे मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले, दिले. याचाच दुसरा अर्थ असाही निघतो की मुख्यमंत्री होण्यासाठी फक्त एका समाजाचा सर्वोच्च नेता असणं पुरेसं नाही. उलट कधी कधी असं असणं मुख्यमंत्रिपदासाठी अडचणीचंच ठरलेलं दिसतं. संभाजी छत्रपती हे कोडं कसं सोडवतील?

8. मतांची गणितं कशी जोडणार?

लोक राजे म्हणत असले तरीसुद्धा राजांनाही देशातली लोकशाही लागू आहे आणि त्यात मत हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ते मिळवणं वाटतं तेवढं सोप्पं नाही. खुद्द संभाजी छत्रपतींना 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत याचा अनुभव आला असणार. कारण त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते भाजपमुळे राज्यसभेवर आहेत. उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांना शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून देश ओळखतो. पण निवडणूक जिंकण्यासाठी तेवढीच ओळख पुरेशी नाही हे पुन्हा पुन्हा दिसून आलंय. फक्त संभाजी छत्रपतीच नाही तर
खुद्द उदयनराजेंनाही जनतेनं पराभव दाखवलेला आहे. त्यामुळेच मतांचं गणित, तेही अठरापगड जातीत विखुरलेल्या महाराष्ट्राचं जमवणं वाटतं तेवढं सोपं नाही.

9. भाजपा तरी पाठिंबा देईल का?

संभाजी छत्रपती हे कितीही सामाजिक भूमिका मांडत असले तरीसुद्धा त्यांची ओळख ‘भाजपचे खासदार’ म्हणूनच सध्या तरी रुजलेली आहे. तसं नसतं तर मराठा संघटनांनी त्यांना आताच, भाजपातून बाहेर पडा, तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं म्हटलं नसतं. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
म्हणून भाजप संभाजी छत्रपतींचं नाव घोषीत करणार का असे सवाल आताच विचारले जातायत. भाजपनं दिलेले मुख्यमंत्र्यांची नावं पाहिली तर अल्पसंख्यांक समाजातल्या नेत्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची संधी दिलेली दिसते.

10. आणि मुद्दाच संपला तर

असं अनेकदा झालंय की, एखादा व्यक्ती एखाद्या मुद्यावर सर्वोच्च नेता झालाय. पण जसाही तो प्रश्न, मुद्दा निकाली निघाला तर त्याचं नेतृत्वही संपलंय. उद्या मराठा आरक्षणाचा प्रश्नच निकाली निघाला तर त्याच मुद्यावर मुख्यमंत्री करा म्हणणाऱ्या संभाजी छत्रपतींच्या नेतृत्वाचं काय होणार? बरं तसही छत्रपतींचं घराणं महाराष्ट्राच्या राजकारणात तसं फार सक्रिय राहीलेलं नाही. त्यांनी सामाजिक कार्यातच स्वत:ला गुंतवून घेतल्याचं दिसतं.

त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपतींना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर काय काय करायला लागेल याचा अंदाज यावा. पण संभाजी छत्रपती हे एक सुसंस्कृत, मृदूभाषी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ह्या इच्छा, आकांक्षेचा महाराष्ट्राला फायदाच होईल हे निश्चित.

संबंधित बातम्या 

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें