Sambhaji Chhatrapati: छत्रपतींना अपक्ष उतरवण्याची भाजपाची खेळी यशस्वी? सहाव्या जागेसाठी शेवटच्या मिनिटाला राजेंना पाठिंबा देणार? शिवसेनेला दुसरी जागा मिळणे अवघड?

Sambhaji Chhatrapati: छत्रपतींना अपक्ष उतरवण्याची भाजपाची खेळी यशस्वी? सहाव्या जागेसाठी शेवटच्या मिनिटाला राजेंना पाठिंबा देणार? शिवसेनेला दुसरी जागा मिळणे अवघड?
छत्रपतींना अपक्ष उतरवण्याची भाजपाची खेळी यशस्वी? सहाव्या जागेसाठी शेवटच्या मिनिटाला राजेंना पाठिंबा देणार?
Image Credit source: tv9 marathi

Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तसेच आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं.

भीमराव गवळी

|

May 23, 2022 | 2:31 PM

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) हे शिवसेनेतून (shivsena) लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संभाजीराजेंना अपक्ष म्हणूनच मैदानात उतरवण्याची खेळी भाजपची खेळी यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. संभाजी राजेंना अपक्ष म्हणून मैदानात उतरवायचे. त्यांना शेवटच्या क्षणाला पाठिंबा द्यायचा आणि शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही कोंडी करायची ही खेळी त्यामागे असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही खेळी खेळताना घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अपक्षांची शिल्लक मते आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तसं झाल्यास आघाडीसाठी (mahavikas aghadi) हा मोठा धक्का असू शकतो. अपक्ष आपल्या गळाला लागू शकतात याचा अंदाज भाजपला येऊ शकतो. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार अस्थिर होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे संभाजीराजे शेवटपर्यंत मैदानात राहिले तर केवळ शिवसेनाच नाही तर आघाडीतील मित्रपक्षांसाठीही ती डोकेदुखी ठरू शकते, असंही राजकीय सूत्रं सांगतात.

संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तसेच आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सर्वात आधी भेट घेतली. सहावी जागा निवडून आणण्याची मते शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे असतानाही संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.

संभाजीराजेंचे गणित काय?

संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडी आणि भाजपची मते घेऊन राज्यसभेवर जाण्याचं त्यांचं गणित होतं. छत्रपतींच्या घराण्यातील असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे राज्यसभेचा मार्ग सोपा होईल, असं संभाजीराजेंना वाटत होतं. मात्र, शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातल्याने संभाजी राजेंच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. मात्र, असं असलं तरी शिवसेनेचा हा निर्णय भाजपच्याच पथ्यावर पडताना दिसत आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शेवटच्या क्षणी भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देईल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरेल. घोडेबाजारही होईल. आघाडीचे आमदार फुटले तर सरकार अस्थिर असल्याचा मेसेज जाईल. आणि आमदार नाही फुटले अन् संभाजीराजे पराभूत झाल्यास शिवसेनेमुळे छत्रपती घराण्याचा व्यक्ती पराभूत झाल्याचा मेसेज महाराष्ट्रात जाईल. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा भाजप अस्मितेचा मुद्दा म्हणून पुढे आणू शकेल, असं सूत्रं सांगतात. शिवाय या खेळीमुळे शिवसेनेची दुसरी जागाही धोक्यात येऊ शकते, असा अंदाजही वर्तवला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

त्या मतांवर घोडेबाजार?

महाविकास आघाडीकडे सध्या 169 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 आमदार आहेत. तर भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106 आमदार, रासप, जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष 5 आमदार आहेत. या आकडेवारीनुसार आघाडी आपले तिन्ही उमेदवार निवडून आणू शकते. तर उरलेली 27 मते आणि इतर अधिक अपक्षांची 16 मते मिळून चौथा खासदारही महाविकास आघाडी निवडून आणू शकते. दुसरीकडे भाजप आकडेवारीनुसार दोन जागा सहज निवडून आणू शकते. दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 22 मते शिल्लक राहतात. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांची 7 मते अशी एकूण 29 मते शिल्लक राहतात. भाजपने संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर हे 29 मते संभाजीराजेंना मिळतील. त्यानंतर महाविकास आघाडीचे अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून जी 16 मते आहेत, त्या मतांची फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. तसेच संभाजी राजे पराभूत झाल्यास समाजात चुकीचा मेसेज जाईल अशी भीती आघाडीच्या अनेक आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार ऐनवेळी काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें