
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या अति दुर्गम डोंगरी भाग असलेल्या कोंढरी गावची इयत्ता ७ वीत शिकणारी कुमारी आदिती पारठे हिची नासाला जाण्यासाठी निवड झाली आहे.

दुर्गम अशा निगुडघर जिल्हा परिषदत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिती पारठे हिची साता समृद्रापार अमेरिकेत नासा या अंतराळ संस्थेला भेट देण्यासाठी जाणाऱ्या २५ विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना 'नासा'ला जाण्याची संधी मिळाली आहे.त्यामध्ये आदिती हिची निवड झाल्याने तिचे कौतूक होत आहे.

६ वी आणि ७ वीत शिकणाऱ्या १६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा दिली होती, त्यानंतर या विद्यार्थ्यांमधून २५ विद्यार्थ्यांची नासा या अंतराळ संस्थेला भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर तिसरा टप्प्यात मुलाखत घेण्यात आली.त्यानंतर १६ हजार विद्यार्थ्यांमधून या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

अतिदुर्गम डोंगराळ भागात शिक्षण घेत असूनही, हे सर्व टप्पे पार करत आदिती हिने १६ हजार विद्यार्थ्यांमधून, ही बाजी मारली आहे.

आदिती हिची नासा संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्यानंतर तिच्याशी आणि तिच्या कुटुंबीयांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विनय जगताप यांनी

नासामध्ये गेल्यानंतर मोठे मोठ्या शास्त्रज्ञांना भेटायला मिळेल,तिथे कायं कामं चालत हे पाहायला मिळेल नासा अंतराळ संस्था प्रत्यक्ष पाहायला मिळेल, याचा आनंद होतोय अशी प्रतिक्रिया अदिती पारठे हिने दिली आहे.