
मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा चालू होती. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर तो प्रत्यक्ष विवाह सोहळ्याची जोमात तयारी करत होता. आता सूरज बोहल्यावर चढला आहे.

सूरज चव्हाणचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याला बिग बॉस मराठीची सिझन पाचची स्पर्धक जान्हवी किल्लेकर उपस्थित होती. हळदी समारंभातही जान्हवीने मोठी धमाल केली. सूरजच्या लग्नाच्या दिवशी शेकडो लोकांनी हजेरी लावल्याचे दिसले. यावेळी सूरजची मोठ्या थाटात वरात काढण्यात आली.

सूरजच्या पत्नीचे नाव संजना असे आहे. सूरज आणि संजना या दोघांचे प्रत्यक्ष लग्नमंडपातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सूरज चव्हाण फारच आनंदी असल्याचे दिसतोय. सोबतच संजनादेखील हसत असलेली पाहायला मिळत आहे.

सर्व प्रथा-परंपरा पार पाडून सुरज-संजना आता विवाह बंधनात अडकले आहेत. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. सूरज आता संजनासोबत एका नव्या अध्यायाची सुरुवात करतो आहे. त्याला सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सूरजने लग्नाआधी त्याच्या नव्या घराचे बांधकाम पूर्ण केले आहे. याच नव्या घरात त्याच्या हळदीचा समारंभ पार पडला. आता सूरजच्या घरात संजना नावाची लक्ष्मी पाऊल ठेवणार आहे. सुरजच्या संसाराला सुरुवात झाली असून त्याला सिनेजगत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आशीर्वाद दिले जात आहेत.